मिकी माऊस “नाबाद 91′

मध्यंतरी फेसबुकवर एक व्हिडिओ पाहिला. त्यामध्ये एक लहान मुलगी तिच्या आई वडिलांसोबत बागेत येते. तिथे आल्यावर तिला मिकी माऊस दिसतो. आधी थोडीशी हिरमुसलेली ती मुलगी मिकी माऊसला पाहून खूपच खूश होते. त्या मुलीच्या चेहऱ्यावरील भावच बदलून जातात… ती लहान मुलगी मिकी माऊसला जाऊन अलगद बिलगते. मिकी माऊस या नावाची जादू गेली 91 वर्ष अशीच सुरू आहे, हेच यावरून सिद्ध होते. यंदा 18 नोव्हेंबर 2019 रोजी मिकी माऊस 91 वर्षांचा होतोय. 18 नोव्हेंबर 1928 रोजी स्टीमबोट विली या चित्रपटातून मिकी माऊस सर्वप्रथम सगळ्यांसमोर आला होता.

गेली तब्बल 91 वर्षे मिकी माऊस हे कार्टून लहान मुलांना आपलंस वाटतंय. या कार्टूनने संपूर्ण जगभरातील लहान मुलांसोबतच मोठ्यांनाही त्याचा लळा लावलाय. वाढदिवसाच्या केकपासून ते लहान मुलांच्या कपड्यांवर आजही मिकी माऊस आपल्या सर्वांशी जोडलेला आहे.

1928 साली वॉल्ट डिस्ने यांना त्यांची कंपनी चालवण्याकरीता एका नवीन कार्टून कॅरेक्‍टरची गरज होती. त्यांच्याकडील चित्रकारांनी त्यांना गाय, बैल, घोडा, बेडूक, मांजर या प्राण्यांच्या कार्टूनचे चित्र काढून दाखवले. पण वॉल्ट यांना त्यापैकी कोणतेच चित्र आवडले नाही. असंच एक दिवस ऑफिसमध्ये बसलेले असताना वॉल्ट डिस्ने यांना एक उंदीर दिसला आणि त्यावरून त्यांना मिकी माऊस या कार्टून पात्राची कल्पना सुचली. सुरुवातीला वॉल्ट डिस्ने यांनी मिकी माऊस या कार्टूनचे नाव “मॉर्टिमर’ असं ठेवले होते. वॉल्ट यांची पत्नी लिलियन यांना ते नाव आवडले नाही. त्यानंतर मग “मिकी माऊस’ हे नाव दिले गेले.

“कार्निवल किड’ या चित्रपटात मिकी माऊसने पहिला शब्द बोलला होता, “हॉटडॉग’ आणि त्यानंतर मिकी माऊस हे कार्टून पात्र जगातील पहिले बोलणारे कार्टून म्हणून ओळखले जाऊ लागले. 1946 पासून डिस्ने कंपनीतील संगीतकार आणि अभिनेते जिमी मॅक डॉनल्ड यांनी मिकी माऊससाठी आवाज दिला. सुरुवातीला कृष्णधवल असणारे मिकी माऊसचे कार्टून 1935 साली रंगीत स्वरूपात सादर करण्यात आले. मिकी माऊसला सर्वोत्कृष्ट मानल्या जाणाऱ्या ऑस्करची 10 नामांकने मिळाली होती. त्यापैकी “लेंड अ पॉ’ या फिल्मला बेस्ट ऍनिमेटेड शॉर्ट फिल्म हा ऑस्कर पुरस्कार 1942 साली मिळाला होता.

मिकी माऊस हे कार्टून इथून पुढेही भरपूर वर्षे लहान मुलांना आवडत राहील, कारण मिकीच्या चेहऱ्यावरील तजेलदार असं हास्य सर्वांना नेहमीच आपलंस करत राहील. त्यानिमित्ताने युट्यूबवर जाऊन मिकी माऊसचे एक कार्टून नक्की बघा. मिकी माऊसला वाढदिवसाच्या आभाळभरून शुभेच्छा!

– अमोल कचरे

Leave A Reply

Your email address will not be published.