पॅरिस : फ्रान्सच्या नव्या पंतप्रधानांची अखेर निवड झाली आहे. फ्रान्समधील निवडणुका झाल्याच्या काही आठवड्यांनंतर व प्रदीर्घ चर्चा करून त्या देशाचे राष्ट्रपती इम्यॅनूअल मॅक्रॉ यांनी मिशेल बार्नियर यांची पंतप्रधान पदावर नियुक्ती केली आहे. पूर्वी ब्रेक्झिटच्या चर्चेत सहभाग घेणाऱ्या बार्नियर यांच्या नावावर मॅक्रॉ यांनी शिक्कामोर्तब केले असल्याचे राष्ट्रपती भवनाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
देशाची सेवा करण्यासाठी एकात्मिक सरकार स्थापन करण्याची जबाबदारी बार्नियर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ७३ वर्षीय बार्नियर यांनी २०१६ ते २०२१ पर्यंत युरोपीयन युनियनमधून ब्रिटन बाहेर पडण्याच्या अर्थात ब्रेक्झिटच्या चर्चेचे नेतृत्व केले होते. १९५१ मध्ये जन्मलेले बार्नियर वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी सोवाई येथून खासदार म्हणून विजयी झाले होते. एक राजकीय नेता म्हणून फ्रान्स सरकारमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केलेच आणि ते युरोपीय संघाचे आयुक्त म्हणूनही निवडून आले होते. अनेक महत्वाच्या मंत्रालयांची खाती सांभाळण्याचा त्यांना अनुभव आहे.
परराष्ट्र, पर्यावरण, कृषी आदी मंत्रालयांचे काम त्यांनी पाहिले आहे. त्यामुळेच सुरूवातीपासूनच त्यांना पंतप्रधान पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. राष्ट्रपती मॅक्रॉ यांनी निवडणुका झाल्यानंतर बरेच दिवस पंतप्रधान पदासाठीच्या संभाव्य उमेदवारांच्या नावावर चर्चा केली होती. स्थिर सरकार देण्यासाठी आवश्यक पाठिंबा मिळवणारी व्यक्ती त्यांना या पदासाठी हवी होती. तो शोध बार्नियर यांच्या नावापाशी येऊन थांबला. दरम्यान, मॅक्रॉ यांच्या या निवडीला अनेक विरोधी पक्षनेत्यांनी आक्षेप घेतला आहे.