सणसवाडीत हॉटेलमधील छाप्यात तीन हजारांची दारू जप्त
शिक्रापूर -शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी आलेल्या दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने सणसवाडी (ता. शिरूर) येथे अवैध दारू विक्रीवर छापा टाकत कारवाई करून फक्त तीन हजार रुपयांची दारू जप्त करून डोंगर पोखरून उंदीर काढला असल्याचा प्रकार केला आहे.
शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुरू असलेल्या अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याचे आदेश दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांनी त्यांच्या पथकाला दिले होते. त्यांनतर दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक निरीन मोहिते, पोलीस नाईक कमलेश होले, डी. बी. वाईकर यांनी सणसवाडी येथे येऊन अवैध व्यवसायांची माहिती घेतली.
सणसवाडी येथील सराटे वस्ती येथे हॉटेल जय मल्हार येथे छापा टाकला असता तेथे सुरेश गायकवाड हा त्याच्या ताब्यात असलेल्या एका बॉक्समधून नागरिकांना देशी- विदेशी दारूची विक्री करत असल्याचे आढळले. यावेळी कारवाईसाठी आलेल्या पथकाने तीन हजार ऐंशी रुपये किमतीच्या बेचाळीस दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
याबाबत पोलीस नाईक कमलेश शिवाजी होले (रा. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सुरेश लक्ष्मण गायकवाड (रा. सणसवाडी, ता. शिरूर) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळासाहेब थिकोळे करीत आहेत.
शिक्रापूर पोलीस करतात काय?
शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनेक ठिकाणी अवैध व्यवसाय सुरू आहेत. त्याठिकाणी कारवाई करण्यासाठी दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाला यावे लागत आहे. परंतु शिक्रापूर पोलिसांकडून कारवाई होत नाही. त्यामुळे शिक्रापूर पोलीस करतात तरी काय. त्यांना येथील हे व्यवसाय दिसत नाहीत का, असा सवाल नागरिकांमधून व्यक्त होत आहे.