Jasprit Bumrah Injury IPL 2026 : आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वी हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, मैदानावरील कामगिरी याच्या अगदी उलट झाली आणि मुंबईचा संघ सर्वात आधी प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. मुंबईच्या या अपयशात संघाचा मुख्य अस्त्र आणि स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यालाही सूर गवसला नाही. संपूर्ण हंगामातील १३ सामन्यांत बुमराहला केवळ ४ विकेट्स घेता आल्या. आता त्याच्या खराब कामगिरी मागचे सर्वात मोठे कारण उघड केले आहे. टी-२० वर्ल्ड कपमध्ये दुखापतग्रस्त असूनही खेळला बुमराह! आता २४ मे रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणाऱ्या मुंबईच्या शेवटच्या लीग सामन्यापूर्वी, मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने म्हणाले, “टी-२० वर्ल्ड कप २०२६ दरम्यान जसप्रीत बुमराह एका हलक्या दुखापतीशी झुंजत होता. त्याने त्या संपूर्ण स्पर्धेत वेदना सहन करत सर्व सामने खेळले. वर्ल्ड कप संपवून जेव्हा तो आयपीएल २०२६ मध्ये खेळण्यासाठी दाखल झाला, तेव्हा आम्ही त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी पुरेसा वेळ दिला. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये आम्ही त्याच्यावर जास्त दबाव टाकू इच्छित नव्हतो. याच कारणामुळे सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये त्याच्या गोलंदाजीचा वेग नेहमीपेक्षा कमी पाहायला मिळाला.” “आता बुमराह १००% फिट, पण लय मिळायला वेळ लागला” बुमराहच्या फिटनेसवर पुढे बोलताना जयवर्धने म्हणाले की, “गेल्या ४ ते ५ सामन्यांपासून बुमराह आता पूर्णपणे तंदुरुस्त होऊन खेळत आहे. परंतु, जेव्हा तुम्ही गंभीर दुखापतीनंतर संघात पुनरागमन करता, तेव्हा जुनी लय आणि फॉर्म परत मिळवण्यासाठी थोडा वेळ लागतो. बुमराहच्या बाबतीतही नेमके हेच घडले. जरी त्याला या हंगामात जास्त विकेट्स मिळाल्या नसत्या, तरी त्याने धावा खूप कमी दिल्या असून त्याचा इकॉनॉमी रेट ८.३६ चा राहिला आहे.” हेही वाचा – Jacob Bethell Injury : पहिल्या क्वलिफायर सामन्यापूर्वी आरसीबीला मोठा धक्का! स्टार खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून पडला बाहेर विरोधी संघांची ‘ती’ रणनीती मुंबईला नडली! विरोधी संघांनी बुमराहविरुद्ध मोठी रिस्क न घेण्याची रणनीती आखली होती. बुमराहच्या षटकांमध्ये फक्त खेळून काढायचे आणि त्याला विकेट देण्यापासून रोखायचे, असा विचार विरोधी फलंदाजांनी केला होता. दुर्दैवाने, फलंदाज बुमराहच्या ओव्हर्स सावध खेळत असताना, त्याचा फायदा घेऊन विकेट्स काढण्यात मुंबईचे इतर गोलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले, अशी कबुलीही जयवर्धने यांनी दिली.