“एमएचटी-सीईटी’ राज्यभरात सुरळीत सुरू

पुणे – अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी तंत्रज्ञान व दुग्ध व्यवसाय या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी “एमएचटी-सीईटी’ परीक्षेला आजपासून सुरूवात झाली. ही परीक्षा टप्प्याटप्याने 13 मेपर्यंत चालणार आहे. यंदाच्या वर्षीपासून पहिल्यांदाच ऑनलाईन परीक्षा सुरुळीतपणे सुरू असल्याचे चित्र आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत एमएचटी-सीईटी परीक्षा राबविली घेतली जाते. सर्व जिल्ह्यामध्ये संगणक व अन्य सुविधांच्या उपलब्धतेनुसार केंद्रांवर परीक्षेला सुरूवात झाली. दररोज दोन सत्रात ही परीक्षा होत आहे. राज्यातील व राज्याबाहेरील एकूण 4 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देत आहेत. पीसीएम ग्रुप असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा शुक्रवारीदेखील घेतली जाणार आहे. त्यानंतर 4 मे पासून पीसीएमबी ग्रूप असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे.

परीक्षा ऑनलाइन होत असली तरी गणिते सोडविताना करावयाचे कच्चे काम करण्यासाठी विद्यार्थ्यांना एक किंवा दोन कोरे पेपर देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात गणिते सोडविण्याची प्रक्रिया मोठी असल्याने, त्यासाठी देण्यात येणारे कागद अपुरे पडत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.

यासंदर्भात आयआयटीन्स प्रशिक्षण केंद्राचे संचालक दुर्वेश मंगेशकर म्हणाले, “राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या जेईई मेन्स परीक्षेच्या तुलनेत एमएचटी-सीईटी ही परीक्षा अत्यंत सोपी होती. प्रश्नांची संख्या आणि उपलब्ध असलेला वेळ पाहता अनेकदा विद्यार्थ्यांना प्रश्न सोडविण्यासाठी वेळ पुरत नाही. मात्र आजचा गणिताचा पेपर दिलेल्या वेळेपूर्वीच सोडवून झाला. केमेस्ट्री व फिजिक्‍सचे प्रश्नही तुलनेने सोपे होते.’

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.