पुणे – वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट, आयआयटी आणि अभियांत्रिकी प्रवेशासाठी असलेली जेईई मेन्सचा निकाल जाहीर झाला. मात्र, राज्यातील अभियांत्रिकी, फार्मसी व कृषी प्रथम वर्ष प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटीचा निकाल अद्याप जाहीर करण्यात आला नाही.
एमएचटी-सीईटीच्या निकालाकडे लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, एमएचटी-सीईटीचा निकाल १९ जूनपूर्वी जाहीर केला जाणार असल्याचे राज्य सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले.
राज्य सीईटी सेलमार्फत पीसीएम व पीसीबी ग्रुपच्या सीईटीचा निकालाची तारीख यापूर्वी जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार सीईटीचा निकाल १२ जूनपूर्वी जाहीर केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता दोन दिवसांत सीईटीला निकाल लागेल, अशी विद्यार्थी व पालकांची अपेक्षा होती.
मात्र, राज्य सीईटी सेलने निकालाची नवीन तारीख जाहीर केली आहे. येत्या 19 जून रोजी किंवा त्यापूर्वी निकाल जाहीर केला जाणार असल्याची घोषणा सीईटी सेलच्या संकेतस्थळाद्वारे केली आहे. त्यामुळे निकालासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
अशी आहे विद्यार्थी संख्या
राज्यातील पीसीबी ग्रुपच्या 3 लाख 41 हजार 765 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील 2 लाख 95 हजार 576 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर पीसीएम ग्रुपच्या नोंदणी केलेल्या 4 लाख 11 हजार 173 विद्यार्थ्यांपैकी 3 लाख 79 हजार 868 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 6 लाख 75 हजार 444 एवढी असून सर्व विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.