म्हसवड -म्हसवड पालिकेच्या सभागृहात शनिवारी घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तातडीच्या उपाययोजना राबवून पालिका हद्दीतील सर्व प्रभाग सॅंनिटायझर करून प्रत्येकाने आपापल्या प्रभागाची काळजी घेण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून नगराध्यक्ष भगतसिंग विरकर यांच्या अध्यक्षतेखाली व उपनगराध्यक्षा स्नेहल सूर्यवंशी, मुख्याधिकारी चेतना केरुरे, गटनेते धनाजी माने इतर सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या सभेत सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
यावेळी करोना विषयावरती चर्चा होऊन म्हसवड शहरामध्ये नगरपालिकेच्या वतीने होमिओपथीच्या “अर्सेनिकम अल्बम 30′ ही प्रतिकारशक्ती वाढवणारी औषधे, मास्क, सॅनिटायझर म्हसवड शहरातील प्रत्येक ठिकाणी वाटप करण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. शहरातील आपल्या प्रभागातील प्रत्येक वाडीवस्ती गल्लीबोळात जंतुनाशक फवारणी करून घ्यावी तसेच परगावाहून आलेल्या नागरिकांवर लक्ष ठेवून त्यांची रोजच्या रोज माहिती नगरपालिकेकडे आपापल्या प्रभाग समितीच्या माध्यमातून देण्याचे ठरले. जाहिरातीच्या माध्यमातून लोकांना सूचना करणे.
नगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या दृष्टीने जे करणे आवश्यक आहे ते सर्व केले जाईल. नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी व काही अडचणी असल्यास किंवा काही सूचना असल्यास तात्काळ नगरपालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहन नगराध्यक्ष तुषार वीरकर व उपाध्यक्षा सौ स्नेहल सूर्यवंशी यांनी केले. सुरुवातीला सर्व विषय मंजूर करून घ्यावेत, अशी सूचना उपाध्यक्षा स्नेहल सूर्यवंशी यांनी मांडली. त्याला सर्व नगरसेवकांनी एकमताने अनुमोदन दिले. या सभेस गटनेते धनाजी माने, नगरसेवक गणेश रसाळ, शहाजी लोखंडे, केशव कारंडे, डॉं. वसंत मासाळ, हिंदमालादेवी राजेमाने, कलाबाई पोकळे, सविता म्हेत्रे, सविता माने, शोभा लोखंडे, साळूबाई कोळेकर, मनीषा विरकर, विकास गोंजारी व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते