टाकळी हाजी – म्हसे बुद्रुक येथे मुंबई येथून आलेले व क्वारंटाइन केलेल्या पैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गाव सील करण्यात आले असून उर्वरीत लोकांची तपासणी सुरू आहे. अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदिप बिक्कड यांनी दिली. ग्रामविकास अधिकारी राजेश खराडे तसेच डॉ. बिक्कड, केंद्रप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी म्हसे बुद्रुक येथे कुटुंब सर्वेक्षणाचे नियोजन केले.
यात दहा टीम नेमल्या असून त्यात शिक्षक, अंगणवाडी सेविका व आरोग्यसेवक अशी टीम करण्यात आली. करोना बाधितांच्या नागरिकांच्या कोणी संपर्कात आलेत का? तसेच आजाराची लक्षणे आहेत का याची तपासणी करण्यात येऊन नोंदी केल्या जाणार असल्याचे डॉ. बिक्कड यांनी सांगितले.
तसेच बाहेरील नागरिक गावात येऊ नये म्हणून चार ठिकाणी चेक पोस्ट नाके तैनात असून तेथे शिक्षक, पोलीस व स्थानिक नागरिक तपासणी करणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी खराडे यांनी सांगितले.
टाकळी हाजी परिसर खबरदारी म्हणून संपूर्ण सीलबंद केला असून गावात अत्यावश्यक सेवा म्हणून दवाखाना व मेडिकल सुरू असून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आलेले आहेत.
दरम्यान शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांनी म्हसे बुद्रुक गावाला भेट दिली. लोकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले.