नेवासा : खंडोबादेवाची सासुरवाडी व म्हाळसा देवीचे माहेरघर असलेल्या नेवासा बुद्रुक येथील पुरातन श्री म्हाळसा खंडोबा बानाई मंदिरात “येळकोट येळकोट जय मल्हार”असा जयघोष करत वाजंत्री वाजवत श्री खंडोबा म्हाळसादेवीचा विवाह सोहळा भक्तिमय वातावरणात सोमवारी साजरा करण्यात आला.
विवाह सोहळयाच्या निमित्ताने रविवारी सायंकाळी ६ वाजता हळदी समारंभ करण्यात आला. यासाठी खंडोबाची वाकडी येथून सेवेकरी गोरक्षनाथ साबदे,पुजारी संजय घोडके,सावळेराम आहेर,ज्ञानेश्वर कोते यांनी सपत्नीक येऊन म्हाळसादेवीला हळद लावून पूजन केले.पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर सोमवारी दुपारी २ वाजता म्हाळसादेवी खंडोबादेवाचा विवाह सोहळा साजरा करण्यात आला.
यावेळी पुरातन म्हाळसा खंडोबा बाणाई मंदिराचे मार्गदर्शक संभाजीराव ठाणगे व सौ.संगिता ठाणगे यांच्या हस्ते खंडोबादेवाच्या उत्सव मूर्तीचे म्हाळसा देवीच्या मुखवटयाचे मंडोळी घालून पूजन करण्यात आले. सौ.अश्विनी रहाट,सौ.स्वाती रहाट यांनी सुवासिनींचे हळदी कुंकू लावून स्वागत केले. ग्राम पुरोहित लालागुरू जोशी यांनी मंगलाष्टके गाऊन विवाह सोहळयाचे पौरोहित्य केले.
या प्रसंगी पुरातन मंदिराचे व्यवस्थापक संभाजीराव ठाणगे यांनी आलेल्या भक्त गणांसह मान्यवर मंडळींचे स्वागत केले.भोगीच्या दिवशी पौर्णिमेला म्हाळसा मातेचा शुभ विवाह पाली येथे साजरा होतो. नेवासा बुद्रुक येथे म्हाळसामातेचा जन्म झाला असल्याने याच क्षेत्री विवाह सोहळा साजरा करण्याची परंपरा सुरू करण्याचा निर्धार करण्यात आला असल्याचे सांगून हा विवाह सोहळा आता दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येईल असे त्यांनी यावेळी बोलताना जाहीर केले.
या प्रसंगी ह. भ. प प्रवचनकार रंजनाताई भाकरे,मंदिर सेवेकरी शांताबाई रहाट,टोका येथील खंडोबा मंदिराचे सेवेकरी शांतवन खंडागळे,पुरातन मंदिर भक्त मंडळाचे सेवेकरी संजय कुटे,राजेंद्र काशीद,बालू फसले,लक्ष्मण फसले,शांताराम बोर्डे,गणेश मंडलिक, पुजारी प्रसाद रहाट मारुती कर्डीले,अशोक टेमकर यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पत्रकार सुधीर चव्हाण यांनी विवाह सोहळयाचे सूत्रसंचालन केले तर संभाजीराव ठाणगे यांनी आभार मानले.यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
म्हाळसा खंडोबा विवाह सोहळयाच्या निमित्ताने आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी भेट देऊन दर्शन घेतले व देवस्थानला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तर संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख हभप देविदास महाराज म्हस्के यांनी भेट देऊन दर्शन घेतले.