पुणे : म्हाडा भरती पेपरफुटी प्रकरणातील अटक आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचे तांत्रिक विश्लेषण करण्यास वेळ लागत आहे. तांत्रिक विश्लेषण आरोपींच्या समक्ष करून त्याद्वारे पुरावे गोळा करायचे आहे.
गुन्ह्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सहाय्यक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. त्यानुसार जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस प्रा. लि. या कंपनीचा संचालकासह अटक तीघांच्या पोलीस कोठडीत प्रथमवर्ग न्यायाधीश एस.जे. डोलारे यांनी दोन दिवसांची वाढ केली.
डॉ. प्रितिश दिलीपराव देशमुख (वय 32, रा.खराळवाडी, पिंपरी चिंचवड), अंकुश रामभाउ हरकळ (वय 44,रा. किनगांवराजा, ता.सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) आणि संतोष लक्ष्मण हरकळ (वय 42, रा.चिखलठाणा, जि. औरंगाबाद) असे पोलीस कोठडीत वाढ करण्यात आलेल्या तिघा आरोपींचे नावे आहेत.
याप्रकरणी नितीन माने (वय 47) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.