पाटणा – विरोधकांकडून होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सामना करणारे बिहारचे शिक्षणमंत्री मेवालाल चौधरी यांनी अखेर आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. तीनच दिवसांपूर्वी त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र पहिल्या दिवसापासून त्यांना लक्ष्य केले जात होते व थेट नितीश कुमार यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले गेल्यानंतर अखेर मेवालाल चौधरी यांनी राजीनामा दिला.
मेवालाल यांनी बुधवारीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. तेव्हाच त्यांच्या राजीनामा घेतला जाणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती. ती खरी ठरली आहे. आपल्यावर आरोप केले जात आहेत. मात्र, जेव्हा आरोपपत्र दाखल केले जाते किंवा न्यायालय तसे आदेश देते तेव्हाच आरोप सिद्ध होत असतात, असा युक्तिवाद मेवालाल चौधरी यांनी केला होता. मात्र तो त्यांच्या कामी आला नाही.
संयुक्त जनता दलाचे नेते असलेले मेवालाल चौधरी 2017 मध्ये भागलपूर सबौर कृषी विद्यापीठाचे कुलपती होते. त्यावेळी त्यांनी भ्रष्टाचार केल्याचे आरोप त्यांच्यावर झाले होते. पदावर असताना नियम बासनात गुंडाळून ठेवत त्यांनी 171 सहाय्यक प्राध्यापक आणि संशोधकांची भरती केली होती, असा त्यांच्यावर आरोप आहे.
विद्यापीठाच्या परिसरात एका इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यातही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होता. असे असतानाही मेवालाल यांना मंत्री केले गेल्यामुळे राष्ट्रीय जनता दल आणि अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हा मुद्दा लावून धरला होता. अखेर त्याची परिणती मेवालाल यांच्या गच्छंतीत झाली.