उर्वरित काम अंतिम टप्प्यात- डॉ. ब्रिजेश दीक्षित
पिंपरी – पुणे महामेट्रोचे वल्लभनगर येथील स्टेशनवर पूजन करण्यात आले. मेट्रोचे वैदिक पद्धतीने मंत्रोच्चारण, पूजन करुन श्रीफळ वाहण्यात आला. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी महामेट्रो प्रकल्पाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. या प्रकल्पाच्या उद्घाटनास पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा ढोरे यांच्यासह खासदार, आमदारांना डावलले आहे. एकाही लोकप्रतिनिधी व महापालिका पदाधिकाऱ्यांना या कार्यक्रमास निमंत्रण देण्यात आलेले नाही.
पुणे महामेट्रोचे पिंपरी-चिंचवड शहरातील काम वेगात सुरू आहे. मेट्रोचे सहा डबे (कोच) मोठ्या अवजड क्रेनच्या सहाय्याने रुळावर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे मेट्रोची रुळावरुन चाचणी घेण्यास लवकरच सुरुवात होईल. पिंपरी ते फुगेवाडीपर्यंत ही चाचणी सुरू राहणार आहे. उर्वरित काम लवकर पूर्ण करण्याचे महामेट्रोचे प्रयत्न सुरू आहेत.
पुणे महामेट्रोचे पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मार्गांवरील काम प्रगतीपथावर आहे. जून 2017 मध्ये महामेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मेट्रो मार्गिकेचे खांब उभारणे, रूळ अंथरणे, विद्युत तारा, सिग्नल आणि अन्य तांत्रिक कामे वेगाने झाली. तीस महिन्यांच्या कालावधीत बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. त्यानंतर, मेट्रोसाठी नागपूर येथून कोच आणण्यात आले आहेत.
डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले की, पुणे मेट्रो प्रकल्पाने 31 किलोमीटर अंतर व्यापले आहे. पुणे व पिंपरी चिंचवड मनपाद्वारे दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेडने प्रवासी मार्गाची आखणी केली आहे. पुण्याच्या प्रवाशांना सुलभतेने प्रवास करता यावा हा मेट्रोचा मुख्य उद्देश आहे. मेट्रोच्या जलद आणि सुखकारक प्रवासासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर पुणे मेट्रोचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यातून जवळपास 50 लाख प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.
पिंपरी ते स्वारगेट हा 16.6 किलोमीटर अंतर असून, 14 स्थानके आहेत. रेल्वे मार्गात कॉरिडॉर एक भूयारी आणि रस्त्याच्या वरील भाग अशा दोन्ही रेल्वे मार्गांचा समावेश आहे. पिंपरी ते फुगेवाडीपर्यंत मेट्रो मार्चअखेर रुळावरुन धावणार आहे. तसेच उर्वरित फुगेवाडी ते स्वारगेट हे देखील काम लवकरच पूर्ण करणार असल्याचे ते म्हणाले.