माधुरी मिसाळ : मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात
स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गाच्या विस्तारासाठी प्रयत्न करणार
पुणे – मेट्रोमुळे पुणेकरांचे जीवन गतिमान होईल. मेट्रो ही सुरक्षित, जलद, विश्वसनीय, किफायतशीर, पर्यावरण संवर्धन करणारी आहे. यामुळे पुणेकरांचे जीवन सुसह्य आणि गतिमान होईल, असा विश्वास पर्वती मतदार संघातील भाजपच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केला.
पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, आरपीआय महायुतीच्या वतीने मार्केट यार्ड परिसरात आयोजित करण्यात आलेल्या पदयात्रेच्या समारोपप्रसंगी मिसाळ बोलत होत्या. यावेळी भाजपचे शहर सरचिटणीस दीपक मिसाळ, नगरसेवक प्रवीण चोरबेले, गणेश घुले, आप्पा कोरपे उपस्थित होते.
“आघाडी आणि यूपीएच्या श्रेयवादात मेट्रो प्रकल्प 15 वर्षे रखडला. केंद्र आणि राज्यात सत्ता आल्यानंतर भाजप सरकारने केवळ 3 वर्षांत 3 मार्गिकांवर 54 किमी मार्गावर मेट्रोचे काम सुरू केले आहे. स्वारगेट मेट्रोचा कात्रजपर्यंत विस्तार करण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत आहे. या मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल अंतीम टप्प्यात असल्याचे मिसाळ म्हणाल्या.
मेट्रो प्रकल्पासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करणार असून, पर्वती मतदारसंघातील प्रवाशांची गरज लक्षात घेऊन स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गाचा विस्तार करणार असल्याचे मिसाळ यांनी यावेळी सांगितले.
नवीन मार्केट यार्डचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अद्ययावत फूलबाजाराचे काम अंतीम टप्प्यात आले असल्याची माहिती आमदार मिसाळ यांनी यावेळी दिली.