पुणे मेट्रोसाठी शुक्रवार ठरला ऐतिहासिक
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील संत तुकाराम नगरपासून पुढे सव्वा किलोमीटरदरम्यान शुक्रवारी (दि.10) घेण्यात आलेली मेट्रोची पहिली चाचणी यशस्वी ठरली. सव्वा किलोमीटर अंतरात घेण्यात आलेल्या चाचणीनंतर पुणे मेट्रोसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरल्याचा दावा मेट्रो प्रशासनाने केला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील संत तुकाराम नगर येथे मेट्रोचा पहिला खांब उभारण्यात आला होता. त्यानंतर मेट्रोच्या दोन्ही ट्रेनही तुकाराम नगर येथेच आणण्यात आल्या होत्या. 31 डिसेंबर रोजी पहिली ट्रेन रुळावर चढविण्यात आली होती. मेट्रोची इलेक्ट्रिक चाचणी घेण्याची सर्व प्रक्रिया व परवानग्या घेण्याची तयारी मेट्रो प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून सुरू केली होती.
या परवानग्या मिळाल्यानंतर शुक्रवारी दुपारी इलेक्ट्रिक केबलद्वारे वीज प्रवाह उपलब्ध करण्यात आला. त्यानंतर तुकाराम नगरपासून पुढे 1.2 किलोमीटरची पहिली चाचणी घेण्यात आली होती. तर पुन्हा तुकाराम नगरच्या दिशेने मेट्रोची चाचणी घेण्यात आली. एकूण 2.4 किलो मीटरदरम्यान जाताना आणि
येताना मेट्रोला कोणताच अडथळा आला नाही.
ठरलेले वेळापत्रक पाळण्यासाठी कामे गतीने सुरू
पायाभूत कामे, स्थानके, मेट्रो स्पॅन लॉचिंग, ट्रॅक अंथरणे, विद्युत खांब उभारणे, ओव्हरहेड केबल बसविण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. ठरलेले वेळापत्रक पाळण्यासाठी मेट्रोकडून सर्व कामे गतीने करण्यात येत असल्याचेही मेट्रो प्रशासनाने म्हटले आहे.