ठाण्यात मेट्रोचे रिंग रूट ; नवीन ठाणे ते ठाणे 29 किमी प्रकल्पाला मान्यता

20 उन्नत तर 2 भूयारी अशी 22 स्थानके

मुंबई: वाहतूकीच्या कोंडीतून आता ठाणेकरांची सुटका होणार आहे. ठाणे शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ठाणे शहरातील रिंग रूट (वर्तुळाकार) मेट्रो रेल्वे प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. नवीन ठाणे ते ठाणे या 29 किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पाची किंमत 13 हजार 95 कोटी रूपये असून या मार्गात 20 उन्नत तर 2 भूयारी अशी एकूण 22 स्थानके आहेत. 2025 मध्ये हा प्रकल्प पूर्ण होणार आहे.

ठाणे शहर व परिसरातील वाहतुकीची वाढती गरज भागविण्यासाठी कॉम्प्रिहेन्सीव्ह मोबिलिटी प्लान तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये जलद वाहतूक प्रणाली म्हणून ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रणालीची शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार ठाणे महानगरपालिकेने या मेट्रो मार्गिकेचा सविस्तर प्रकल्पदेखील मंजूर केला. या अहवालास आता शासनानेही मान्यता दिली आहे. सुमारे 13 हजार 95 कोटींच्या या प्रकल्पामुळे 2025 मध्ये दररोज 5 लाख 76 हजार तर 2045 मध्ये दररोज 8 लाख 72 हजार प्रवाशांची वाहतूक करणे शक्‍य होणार आहे. ठाणे शहरातील सर्व मेट्रो मार्गिकांच्या दरात एकवाक्‍यता रहावी म्हणून वर्तुळाकार मेट्रोचे दर हे मेट्रो 4 वडाळा-घाटकोपर-मुलूंड-ठाणे-कासारवडवली या मार्गिकेनुसार राहणार आहेत. या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (महामेट्रो) मार्फत करण्यात येईल. तसेच, हा प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प व महत्त्वपूर्ण नागरी प्रकल्प म्हणून घोषित करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)