मेट्रो मॅन श्रीधरन भाजपच्या वाटेवर

नवी दिल्ली,- देशाचे मेट्रो मॅन म्हणून ओळखले जाणारे ई. श्रीधरन लवकरच भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत. ई. श्रीधरन यांचा पक्षप्रवेश केरळमध्ये होणार असल्याची माहिती केरळ भाजपचे के. सुरेंद्रन यांनी दिली. ई. श्रीधरन 21 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या भाजपाच्या विजय यात्रेदरम्यान औपचारिकरित्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

दिल्ली मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला 2002 मध्ये सुरुवात झाली, तेव्हा ई. श्रीधरन यांच्याकडे मेट्रोची धुरा होती. त्याचप्रमाणे ई. श्रीधरन यांनी कोकण रेल्वेच्या बांधकामासाठीही मोलाचे मार्गदर्शन केले होते. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मान श्रीधरन यांना मिळालेले आहेत.

त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी केलेल्या कामानिमित्त त्यांचा जगभरामध्ये नावलौकिक आहे. त्यांना 2001 साली पद्मश्री तर 2008 साली पद्म विभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. फ्रान्स सरकारने त्यांना विशेष पुरस्कार जाहीर केला होता. तर टाइम मॅगेझिनने त्यांचा उल्लेख आशियाज हिरो या नामावंत व्यक्तींच्या यादीमध्ये केला होता.

श्रीधरन यांनी आपल्या बुध्दीमत्तेच्या जोरावर रेल्वेमध्ये स्वत:ची छाप पाडली. 1964 साली वादळाच्या तडाख्यामध्ये रेल्वेचा महत्वाचा ब्रिज वाहून गेल्यानंतर, श्रीधरन यांच्या नेतृत्वाखाली तो अवध्या 45 दिवसांमध्ये उभारण्यात आला. यासाठी सहा महिन्याचा अवधी दक्षिण रेल्वेने दिला असताना अवघ्या दीड महिन्यामध्ये श्रीधरन यांनी हे काम करुन दाखवले.

कोकण मेट्रो प्रोजेक्‍टवरही ते र्कारत होते. कोकण रेल्वेचा मार्ग कसा बांधता येईल, त्याची रचना कशी असावी, तो प्रत्यक्षात कसा साकारता येईल यासंदर्भातील सर्व नियोजन श्रीधरन यांनी केले. त्यावेळी कोकण रेल्वे हा भारतामध्ये उपलब्ध असणाऱ्या तंत्रज्ञानाच्या दृष्टीने खूपच आव्हानात्मक प्रकल्प होता. पण हे आव्हान श्रीधरन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अगदी सहज पूर्ण केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.