हवामान विभागाला पावसाचा चकवा?

बरसण्याचा अंदाज चुकला : किरकोळ वगळता राज्यभरात विश्रांती

पुणे – शहरासह जिल्ह्यात दिवाळीमध्ये जोरदार पावसाची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली. मात्र, पावसाने हवामान विभागालाच चकवा देत, “गरजण्याऐवजी विश्रांती घेतल्याचे’ दिसून आले. मागील दोन दिवसात पावसाने जिल्ह्यात विश्रांती घेतली असून, केवळ इंदापूर तालुक्‍यात पावसाच्या काही सरी पडल्या.

मागील दहा दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे यंदाची दिवाळी पावसात जाणार, फटाके वाजविता येणार नाही, आकाशकंदीलला छत्री लावावी लागणार, अशा प्रकारचे जोक सोशल मीडियावर फिरत होते. मात्र, पावसाने हवामान विभागाला चकवा देत, दिवाळीचा आनंद घेण्यासाठी थांबला आहे. शनिवारी आणि रविवारी शहरासह जिल्ह्यात ऊन आणि ढगाळ वातावरण होते. जिल्ह्यातील इंदापूर तालुक्‍यात 16 मिमी पावसाची नोंद झाली. अन्य तालुक्‍यांमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यामुळे नागरिकही सुखावले आहे.

रविवारी (दि. 27) सकाळपासून जिल्ह्यात कडक ऊन पडले असून, मध्येच ढगाळ वातावरण होत आहे. मात्र, पावसाने विश्रांती घेतल्यामुळे चिंतेत असलेला शेतकरी सुखावला आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत इंदापूर तालुक्‍यात 16 मिमी पावसाची नोंद झाली असून हवेली तालुक्‍यात 2, तर दौंडमध्ये 1 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसांत जिल्ह्यात पावसाच्या हलक्‍या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.