पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. यामुळे जास्तीजास्त चाचणी करण्याचे प्रशासनाने ठरविले आहे. मात्र या चाचण्या न करताच नागरिकांची चाचणी केली असल्याचे भासविण्याचे काम प्रशासन करत आहे.
एखाद्या नागरिकाच्या घशातील द्राव घेतल्यानंतर त्याची सर्व माहिती महापालिका घेते. त्या व्यक्तीच्या मोबाइल नंबरवर स्वॅब घेतल्याचा संदेश पाठविला जातो. मात्र पिंपळे सौदागर मध्ये स्वॅब न घेताच मोबाइल नंबरवर संदेश पाठविण्याचा पराक्रम महापालिका प्रशासनाने केला आहे.
शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. शहराच्या सर्वच भागात करोनाचे रुग्ण आढळत आहेत. महापालिकेच्या वतीने करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी चाचणी करणे, विलगीकऱण करणे व उपचार करणे या त्रिसुत्रीचा वापर केला जात आहे.
जास्तीतजास्त चाचण्या करण्याचे उदिष्ट पालिका प्रशासनाने ठेवले आहे. त्यामुळे रुग्णांना लवकरात लवकर ओळखून त्यांना वेगळे करता येईल. तसेच ते इतर नागरिकांच्या संपर्कात जाणार नाहीत. मात्र असे करत असताना पालिका प्रशासनाकडून मोठा गोंधळ केला जात आहे. नागरिकांचे स्वॅब न घेताच त्यांना मोबाइल नंबरवर तुमचा स्वॅब घेतला असून पुढील माहितीसाठी सेव्ह करून ठेवण्याचा संदेश पाठविला जात आहे. यातून प्रशासन जास्तीत जास्त चाचण्या करत असल्याचे भासविण्याचा प्रकार सुरु आहे.
याबाबत मला अजून काहीच माहीत नाही. संदेश कसा आला, प्रशासनाकडून असे का होत आहे याची माहिती घेतो.
– डॉ. पवन साळवे, वैद्यकीय अधिकारी.