विसर्जनाचा संदेश…(अग्रलेख)

विघ्नविनाशक गणरायाचे दहा दिवसांच्या मुक्‍कामानंतर राज्यभर विसर्जन झाले आहे. काही अपवाद वगळता आणि काही दुर्घटनांमधील नागरिकांचे मृत्यू वगळता, यावर्षीची विसर्जन मिरवणूक सर्वसाधारणपणे शांततेत आणि वेळेत पार पडल्याचे पाहायला मिळाले. खरे तर धर्मशास्त्राप्रमाणे, अनंत चतुर्दशी ही तिथी असलेल्या दिवसाची सांगता होतानाच सर्व गणेशमूर्तींचे पाण्यात विसर्जन व्हायला हवे, असे मानले जाते. मात्र, अनेकदा गणेश मंडळांमधील सजावट-रोषणाई-झांज-लेझीम पथकांमधील चुरस आणि कोणी आधी-कोणी नंतर जायचे अशा क्षुल्लक वादांमुळे ही मिरवणूक लांबताना दिसते.

शिवाय मंडळांची वाढती संख्याही त्याला कारणीभूत असतातच. पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणी मंडळांची संख्या आणि मूर्तींचा अवाढव्य आकार या समस्याही आहेतच. अशातच गेल्या काही वर्षांत दणदणाट करणारी डॉल्बी प्रकारातली ध्वनीव्यवस्था ध्वनिप्रदूषणाची समस्या उभी करताना दिसते आहे. दोनच वर्षांपूर्वी डॉल्बी सिस्टीमच्या दणदणाटाने सातारा शहरात राजपथावरील एक जुनी इमारत कोसळून त्याखाली 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. विसर्जन मिरवणूक आणि अपघाती मृत्यू हे समीकरणही अनेकदा काही ठिकाणी प्रकर्षाने समोर येते आहे. यावर्षी राज्यभर गणेश विसर्जन शांततेत सुरू असताना विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये दहा जण बुडाले असून नगरमध्ये दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे.

अमरावतीत विसर्जनासाठी पाण्यात गेलेल्या एका बुडणाऱ्या तरुणाला वाचवताना इतर तीन तरुण बुडाल्याची घटना घडली. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमध्येही विसर्जनावेळी तीन आणि सिंधुदुर्गात दोन तरुण बुडाले असून त्यांचा शोध सुरू असल्याचे समजते. अमरावतीच्या भातकुली तालुक्‍यातील वाठोडा शुकलेश्‍वर येथे ही घटना घडली. पूर्णा नदीपात्रात गणेश विसर्जन करताना एक तरुण बुडू लागला. त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी तीन तरुणांनी नदीत उड्या मारल्या. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने हे तीन तरुणही बुडाले. हे चौघेही गौरखेडा येथील रहिवासी आहेत. नदीच्या प्रवाहातील पाण्याचा अंदाज न आल्याने हे चौघेही बुडाल्याचं सांगण्यात येतं. राजापूर येथेही गणपती विसर्जन करताना तीनजण बुडाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. सिंधुदुर्गातही विसर्जनावेळी दोन तरुण बुडाल्याची घटना घडली आहे.

गणपती विसर्जनाच्यावेळी आचरा समुद्रकिनारी गणपती विसर्जनासाठी गेलेले आचरा वरची वाडी येथील दोन युवक बुडाल्याची दुर्घटना घडली. गणपती पाण्यात सोडून परतत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हे दोघेही पाण्यात बुडू लागले. मात्र, दोघांनी एकमेकांना मिठी मारल्याने त्यांना वाचवण्याचे प्रयत्न फोल ठरले. कराडमध्येही आगाशिव नगर येथील एक गणेशभक्‍त कोयना नदीमध्ये वाहून गेला. गणरायाच्या विसर्जनावेळी ही घटना घडली. नगरमध्ये विसर्जनासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. श्रीरामपूर येथील प्रवरा नदीत आणि शेवगावमधील ढोरा नदीत बुडून प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्येही गणेश विसर्जनात विघ्न आले असून खाटलापूर घाट परिसरात बोट उलटून 11 जणांना जलसमाधी मिळाल्याचे समजते.

पुण्यातही बोट उलटण्याचा एक प्रकार घडला. मात्र, बोटीतील चौघांनाही वाचवण्यात यश आले, तर औंध परिसरातील एक मुलगी वाहून गेल्याचे समजते. लक्ष्मी रस्त्यावर मानाच्या भाऊ रंगारी मंडळाच्या रथाला जोडलेले बैल बिथरले होते. मात्र, त्यांना वेळीच नियंत्रणात आणल्याने संभाव्य अनर्थ टळला. एकूणच यावर्षीही दुर्घटनांची पुनरावृत्ती झाली असली, तरी पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावल्याने मिरवणुका फार लांबल्या नाहीत. तसेच पावसाच्या तडाख्याने ढोल-ताशांचे आवाज आणि डॉल्बीच्या आवाजावरही आपोआपच मर्यादा आली होती. एरवी पाऊस पडला नाही अथवा लांबला तरी चालेल, पण विसर्जन मिरवणुकीला पाऊस जरूर पडावा, अशी मनोमन प्रार्थना करणारे अनेक ज्येष्ठ नागरिक आता पाहायला मिळतात.

एका दृष्टीने त्यांचेही बरोबरच मानायला हवे. आवाजाचा अतितीव्र ठणठणाट, आजारी माणसे, ज्येष्ठ नागरिक आणि मिरवणूक मार्गावरील दवाखान्यातील रुग्णांची पर्वाच न करणारे मंडळांचे कार्यकर्ते यांना कोणीतरी आता समजावून सांगणे गरजेचे आहे. पण हे शिवधनुष्य कोण पेलणार, हा प्रश्‍नही आहेच. शिवाय ध्वनीविषयक कायदेशीर तरतुदींनी गणेशोत्सवाच्या अखेरच्या पर्वात जर सवलत दिली जात असेल, रात्री 8 ऐवजी काही तास ध्वनीवर्धकांना जास्त वेळ वाजवण्याची परवानगी दिली जात असेल, तर मग असे नियम-कायदे समाजाच्या काय उपयोगाचे? मागील महिन्यांत सातारा-सांगली-कोल्हापूरसह कोंकण आणि राज्याच्या भामरागड-गडचिरोलीसह अन्य काही भागांत महापुराचे थैमान सर्वांनी अनुभवले आहे. त्यानंतर राज्यासह देशभरातून या पूरग्रस्तांना मदतीचा ओघही वाहता राहिला. त्या पार्श्‍वभूमीवर, यावर्षी गणेशोत्सवावर खर्च कमी केला जाईल, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा फोल ठरली आहे. आपल्याकडे आपत्ती निवारणाची यंत्रणा सक्षम नाही, हे अनेकदा सिद्ध झाले आहे.

महापुरावेळीही सर्वांनी तोच अनुभव घेतला आणि आता विसर्जनावेळीही अनेकांच्या अकाली मृत्यूने हा अनुभव अधिक गडद झाला. अशा स्थितीत आपत्ती निवारण यंत्रणा मजबूत करण्यासाठी, विसर्जनावेळी दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने मंडळे किंवा त्यांचे कार्यकर्ते काही प्रयत्न करतात का, असा प्रश्‍न उपस्थित झाल्यास, अपवाद वगळता, याबाबतीत निराशाच वाट्याला येते, हे वास्तव आहे. खरे तर गणेशोत्सव सार्वजनिक करण्यामागे लोकमान्य टिळक अथवा अन्य समाजधुरिणांची निराळी ध्येये आणि अपेक्षा होत्या.

स्वातंत्र्यपूर्व काळात, समाजाच्या विविध घटकांनी एकत्र येत जुलमी राजवटीविरोधात मनोभूमिका घडवणे अशा अनेक गोष्टी अशा उत्सवाशी निगडीत होत्या. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मात्र या सणांना उत्सवाचे स्वरूप आले आणि सामाजिक कार्य, जनजागृती, कार्यकर्त्यांची पाठशाळा असे त्याचे स्वरूप बनले. पण बदलत्या युगात उत्सवाचे स्वरूप बदलण्यासाठीही प्रयत्न केले गेले पाहिजेत, याकडे मात्र कोणाचे लक्ष असल्याचे दिसत नाही. गणेशोत्सव, नवरात्री, होळी, गोकुळाष्टमी आणि दिवाळी हे सण म्हणजे संकट न वाटता, त्या सणांचा आनंद लुटायला मिळायला हवा, असे वातावरण तयार करण्याकडेच आता लक्ष देणे गरजेचे आहे. विशेषत: पुण्याच्या मध्यवर्ती भागांतील पेठांमधील अनेक नागरिक गणेशोत्सवाच्या काळात- आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान तर हमखास – पुणे सोडून बाहेर जाण्याची एक नवीच पद्धत रूढ करत आहेत. आपले राहते घर सोडून दहा दिवस बाहेर जाण्याची वेळ या नागरिकांवर येत असेल, तर उत्सव आनंददायी कसा म्हणायचा, यावरही विचार होणे गरजेचे आहे. “विघ्नहर्त्याने विघ्न हरणच केले पाहिजे; निदान नवे विघ्न तरी निर्माण होणार नाही’, याची काळजी घेणे, हाच या उत्सवाचा आजचा संदेश आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here