अग्रलेख: गोपीनाथगडाचा संदेश

महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा बहुचर्चित मेळावा अखेर गुरुवारी गोपीनाथगडावर पार पडला. या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी आपण पक्ष सोडणार नसून भाजपमध्येच राहणार असल्याचे जाहीर केल्याने याबाबतच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असला तरी पक्षाला विशेषतः राज्यातील नेत्यांना संदेश देण्याचे काम गोपीनाथगडावरील या मेळाव्याने निश्‍चित केले आहे. या मेळाव्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती असल्याने त्यांच्यासमोर करण्यात आलेल्या विधानांची योग्य दखल घेतली जाईल आणि पक्षाच्या कार्यपद्धतीत सुधारणा केली जाईल, अशी अशा करावी लागेल. या मेळाव्याला आवर्जून उपस्थित राहिलेले एकनाथ खडसे यांनी केलेले थेट भाषण असो किंवा पंकजा मुंडे यांनी मारलेले शालजोडीतील जोडे असोत, राज्यातील नेत्यांनी त्यापासून योग्य बोध घेण्याची गरज आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता आणि खडसे यांच्याऐवजी उमेदवारी मिळालेल्या त्यांच्या कन्येचाही पराभव झाला होता. या पराभवाला पक्षातील नेतेच कारणीभूत आहेत, अशी जाहीर भूमिका खडसे यांनी घेतली होती. पंकजा मुंडे यांनी थेटपणे तसा आरोप केला नसला तरी त्यांची नाराजी लपून राहिली नव्हती. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचे निमित्त साधून गोपीनाथगडावरील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ही नाराजी त्या व्यक्‍त करतील अशी शंका बोलून दाखवली जात होती. पंकजाताई भाजपला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश करतील अशीही शंका होती. कारण मेळाव्याबाबतच्या आपल्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी मावळे हा शब्द वापरला होता. त्यामुळे गोपीनाथगडावरील मेळाव्यात भाजपमध्ये फूट पडेल, असा अंदाज राजकीय तज्ज्ञही व्यक्‍त करीत होते.

दरम्यानच्या काळात ना पंकजा मुंडे यांनी कोणता खुलासा केला ना पक्षाने त्यांच्याकडून खुलासा घेतला किंवा स्वतः खुलासा केला त्यामुळे हा संशय आणि गोंधळ कायम राहिला होता, पण मेळाव्यातील भाषणात पंकजा मुंडे यांनी निसंदिग्ध शब्दात आपण भाजप सोडणार नाही, अशी घोषणा केल्याने या विषयाला पूर्णविराम मिळाला असला तरी भाजपमधील असंतोषाची चर्चा संपली असे म्हणता येणार नाही. कारण या मेळाव्यात भाषण करणाऱ्या प्रत्येक नेत्याने गोपीनाथ मुंडे यांच्या काळातील भाजप आणि सध्याचा भाजप यांमधील फरक जाणीवपूर्वक दाखवून दिला. शेटजी आणि भटजी यांचा पक्ष असलेल्या भाजपला मुंडे यांनी बहुजनांचा पक्ष बनवला ही खडसे यांची टिप्पणी विशेष लक्षवेधी आहे. भाजपचे राज्यातील विद्यमान नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर खडसे यांचा रोख होता हे उघड आहे. पंकजा मुंडे यांनी उघडपणे नाराजी व्यक्‍त केली नसली तरी आपली नाराजी त्यांनी लपवलीही नाही. मन मोकळं केलं नाही तर शरीरात विष तयार होतं, असे विधान करताना पंकजा मुंडे यांनी अनेक विषयांना छेडले आहे.

शेवटच्या दिवसापर्यंत भाजपाचा प्रत्येक आमदार निवडून यावा यासाठी मी प्रयत्न करत होते.तरीही मी बंड करणार अशी पुडी कोणीतरी सोडली. माझी अपेक्षा कोणाकडूनही नाही, त्यामुळे मी नाराज होण्याचा प्रश्‍नच नाही. माझ्या रक्‍तात गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत. त्यामुळे मी बंड करणार नाही, हा पक्ष माझ्या बापाचा आहे, असे सांगत पंकजा मुंडे यांनी आपण अद्यापही पक्षात राहणार असल्याचे जाहीर केले आहे. पंकजा मुंडे पक्ष सोडणार अशी बातमी कोणी लावली याचा शोध घ्यावा, अशी मागणीही त्यांनी व्यसपीठावर चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. पक्षाच्या कोअर कमिटीमधून मुक्‍त करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीचा निश्‍चित अर्थ समजून घेऊन आता फडणवीस आणि पाटील यांना पावले टाकावी लागतील. पंकजा मुंडे यांच्या निर्णयामुळे पक्षात फूट पडण्याची भीती निराधार ठरली असली तरी पक्षातील नाराजी संपली आहे, असे म्हणता येत नाही.

कारण गोपीनाथगडावर उपस्थित असलेल्या बहुतेक नेत्यांनी आपल्या भाषणात पक्षाच्या नेत्यांना उपदेशाचे डोस पाजले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर कदाचित फडणवीस यांचेच सरकार सत्तेवर आले असते तर कोणीही टीका करण्याचे धाडस दाखवले नसते, पण शिवसेनेबरोबरील डाव फिस्कटल्याने विरोधी बाकांवर बसायची वेळ आल्याने आता पक्षातील नाराजांना कंठ फुटला नसता तरच नवल. म्हणूनच भाजपला पक्षातील ही नाराजी अधिकच गांभीर्याने घ्यावी लागणार आहे. आगामी काळात भाजपला पुन्हा सत्तेवर येण्याची आशा असेल तर सध्या पक्ष एकसंध ठेवण्याचे आव्हान पेलावेच लागेल. एकनाथ खडसे यांच्यासारखे नेते पक्षातील नाराजांची मोट बांधण्याच्या प्रयत्नात आहेत. ओबीसी नेत्यांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी हालचाली सुरू केल्या होत्या. पक्षाला सध्या बहुजन नेतृत्व नाही, असे दाखवण्याचा सतत प्रयत्न केला जात आहे.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेऊन खडसे यांनी दबाव टाकण्याचाही प्रयत्न केला आहे. अर्थात, खडसे यांना उमेदवारी नाकारून भाजपने पूर्वीच त्यांच्याबाबत पक्षाचे मत काय आहे हे दाखवून दिले आहे; पण पंकजा मुंडे यांची नाराजी मात्र पक्षाला दुर्लक्षित करता येणार नाही. पक्ष संघटनेत बदल करण्याची वेळ आता आली असल्याने पक्षासाठी महत्त्वाचे असलेल्या नाराज आणि असंतुष्ट नेत्यांचे योग्य पुनर्वसन करावे लागेल. पंकजा मुंडे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, बावनकुळे या नेत्यांचा विशिष्ट समाजगट असल्याने त्यांना पक्ष संघटनेत महत्त्वाची जबाबदारी देण्याचा विचार करण्याची हीच वेळ आहे. सत्ताधारी पक्ष कोणतेही धाडसी प्रयोग करू शकतो, पण तेवढी मोकळीक विरोधी बाकांवर असताना घेता येत नाही.

विरोधी बाकांवर असताना कॉंग्रेस पक्षाला जशी मरगळ आली होती तशी मरगळ भाजपमध्ये येणे पक्षाला परवडणारे नाही. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आलेल्या इतर पक्षातील आयारामांचा उत्साहही टिकवावा लागणार आहे. म्हणूनच गोपीनाथगडावरील या मेळाव्याचा बोध घेऊन भाजपला आपले कार्यकर्ते आणि नेते यांना सावरण्याचे काम करावे लागेल. ओबीसी समाजाचे नेतृत्व म्हणून ओळख झालेल्या पंकजा मुंडे यांचा योग्य उपयोग करून घेण्यासाठी आता पक्षाला रणनीती आखावी लागेल. पंकजा मुंडे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचे किंवा त्यांच्याबाबत गैरसमज पसरवण्याचे काम कोणी जाणीवपूर्वक करीत असेल तर ते थांबवण्याची वेळ आता आली आहे, असा संदेश गोपीनाथगडाने निश्‍चितच दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.