लॉकडाऊनविरोधी आंदोलन होणार तीव्र : दुकाने उघडण्याबाबत संजय काका पाटलांचा सरकारला अल्टिमेटम

सांगली : सर्वत्र करोना रुग्णांची संख्या कमी होत असताना, लसीकरणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना, देशासह जगभर सर्वत्र सर्व व्यवहार स्उरळीत होत असताना राज्य सरकार डेल्टा व्हेरियंटसह विविध भीती दाखवून लॉकडाऊनच्या मागे लपते आहे.

सरकारने तातडीने व्यापाऱ्यांवरील लॉकडाऊन न उठवल्यास आम्ही सर्व व्यापारी रस्त्यावर उतरून दुकाने उघडू, असा सज्जड इशारा भाजपचे सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांनी दिला आहे. त्यासाठी आम्ही सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेटम देत आहोत्‌, असेही पाटील म्हणाले.

राज्यातील बहुतांश भागात कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील काही विशिष्ट भाग वगळता महाराष्ट्रात सर्वत्र कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. असे असले तरी पाश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, अशा जिल्ह्यांमध्ये कोरोनाग्रस्तांचे प्रमाण अजूनही कमी कसे काय झाले नाही, याचा शोध घेण्याची गरज आहे.

सरकार करोनाबाधितांचे खोटे अहवाल तर देत नाही ना, असा संशय येत आहे. आणि रुग्ण संख्या वाढती दाखवत सांगली जिल्ह्यात प्रशासनाकडून विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र या निर्बंधांना आता विरोध होत असून दुकाने सुरु करु द्यावीत अशी मागणी जोर धरु लागली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप खासदार संजय काका पाटील यांनी सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.

सांगले जिल्ह्यातील लोकांची सहनशीलता संपली आहे. किती दिवस लॉकडाऊनचे निर्बंध सहन करायचे. सर्वच जनजीवन ठप्प आहे. व्यापार बंद असल्याने अनेकांचे हाल होत आहेत. एकीकडे कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक झाल्याने कोरोना रुग्ण वाढले. मुळात करोनाचा प्रादुर्भाव होता, तर निवडणूक घेतलीच कशाला? वाळवा, कडेगाव, पलूस या तालुक्‍याची शिक्षा इतर तालुक्‍यांनी का घ्यावी, असा बिनतोड सवालही त्यांनी केला. ज्या तालुक्‍यात रुग्ण संख्या कमी आहे; त्या तालुक्‍यातील दुकानं उघडी करु द्यावीत, अशी संजय काका पाटील यांनी मागणी केली.

सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध कडक करण्यात आले आहेत. पॉझिटिव्हिटी दर हा दहा टक्‍क्‍याच्या पुढे आणि वीस टक्‍क्‍यांच्या आत असल्याने सांगली जिल्ह्याचा चौथ्या स्तरात समावेश करण्यात आला होता. आता राजकीय नेते यांच्यासह व्यापारी संतप्त झाल्याने सरकारला वेगळा निर्णय घेणे भाग पडू शकते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.