नवी दिल्ली – कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स म्हणजे सीएआयटी या व्यापाऱ्याच्या संघटनेचे ई-कॉमर्स पोर्टल लवकरच सुरू होणार आहे. यासाठीचे काम जोमात चालू आहे. आज या संघटनेने पुरवठादारांना या पोर्टलमध्ये सामील करून घेण्यासाठी मोबाईल ऍप सुरू केले. या पोर्टलचे नाव भारत ई- मार्केट आहे.
भारत ई- मार्केट सरकारच्या सर्व नियमांचे पालन करणार आहे. या संघटनेचे महासंचालक प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, परकीय ई- कॉमर्स कंपन्यांचा सामना करण्याचे आम्ही आता ठरविले आहे.
यामुळे भारतातील व्यापाऱ्यांचा आणि ग्राहकांचा फायदा होईल. डिसेंबर महिन्यापर्यंत या पोर्टलवर सात लाख व्यापारी येतील. देशातील 40,000 व्यापाऱ्यांच्या संघटना यामध्ये सामील झाल्या आहेत. या अंतर्गत ई-दुकान सुरू केले जाणार असून यासाठी कसलेही शुल्क घेतले जाणार नाही. इतर ई-कॉमर्स कंपन्या यासाठी उलाढालीच्या पाच ते 35 टक्के रक्कम घेतात. या पोर्टल विकसनासाठी कसलीही परकीय गुंतवणूक घेण्यात येणार नाही.
विशेष म्हणजे या पोर्टलवरून कुठलीही चिनी वस्तू खरेदी किंवा विक्री करता येणार नाही त्याचबरोबर भारतातील महिला आणि इतर कारागिरांच्या वस्तू या पोर्टलवरून प्राधान्यक्रमाने विकण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्यामुळे आत्मनिर्भर भारतीय संकल्पनेला चालना मिळेल असे खंडेलवाल म्हणाले.