पुण्यातील व्यापारी आक्रमक; आज थेट दुकाने उघडणार

काय करायचं ते करा, सरकारला आव्हान

आज काळ्या फिती लावून करणार आंदोलन


राज्य सरकार व महापालिकेच्या निर्णयाचा निषेध

पुणे – राज्य सरकार आणि पुणे महापालिकेने दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा शुक्रवारपासून शहरातील सर्व व्यापारी दुकाने उघडतील, असा इशारा फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशन्स ऑफ पुणेने दिला आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी 11 ते 12 वाजेदरम्यान व्यापारी काळ्या फिती लावून आंदोलन करणार आहेत.

“फॅम’चे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिलेल्या माहितीनुसार, “राज्य सरकार व महापालिकेने दुकाने बंद ठेवण्याचा आदेश मागे घेतला नाही, तर शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता सर्व व्यापारी दुकाने उघडतील. ही दुकाने सायंकाळी सहापर्यंत उघडी ठेवण्यात येतील. शनिवार व रविवारी लॉकडाऊन असल्याने हे दोन्ही दिवस दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील. यानंतर सोमवार ते शुक्रवार नियमितपणे सायंकाळी 6 पर्यंत सुरू ठेवण्यात येतील.

सरकारला जी काही कारवाई करायची आहे, ती त्यांनी करावी. सर्व व्यापारी एकत्र येऊन कारवाईचा विरोध करतील.’ पुणे शहरात 40 हजार व्यापारी व तीन लाख कर्मचारी सदस्य आहेत. या सर्वांचे कुटुंब वेगवेगळ्या व्यवसायांवर अवलंबून आहे. तर व्यवसायाशी संबंधित कारागीर व त्यांचे कुटुंब अशी 20 लाखांपेक्षा जास्त नागरिक संख्या अवलंबून आहे.

सरकारने अत्यावश्‍यक सेवेमध्ये अनेक व्यवसायांचा उल्लेख करून त्यांना लॉकडाऊनमधून वगळले आहे. परंतु, बाकीची सर्व व्यवसायाची दुकाने 30 एप्रिलपर्यंत म्हणजेच जवळपास 25 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यापाऱ्यांवर अन्याय असून करोनापेक्षाही जीवघेणा निर्णय आहे. एप्रिल व मे महिन्यात हिंदूंचे अनेक महत्त्वाचे सण असतात. या सणांच्या पार्श्‍वभूमीवर छोटे-मोठे व्यापारी मालाची खरेदी करून ठेवतात. अचानक लॉकडाऊन झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

…अन्यथा दुकानं उघडणार

पुणे शहर भाजपा व्यापारी आघाडीने महाराष्ट्र सरकार व पुण्यातील स्थानिक प्रशासनाने लादलेल्या नियमांचा तीव्र निषेध नोंदवला आहे. येत्या 48 तासांत सरकारने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या नावाखाली दुकाने व संपूर्ण व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय मागे न घेतल्यास भाजपा व्यापारी आघाडीचे सदस्य व्यापारी दुकाने उघडतील, असा इशारा पुणे शहर भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेंद्र व्यास आणि प्रसिद्धी प्रमुख संजीव फडतरे यांनी दिला आहे.

व्यापाऱ्यांमधील संयम संपलाय : रिटेल व्यापारी संघ
शहरासह जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना या लॉकडाऊनसदृश्‍य परिस्थितीमुळे प्रचंड मोठ्या आर्थिक संकटाला व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सरकार व प्रशासनाने सध्याच्या निर्बंधावर त्वरित विचार करून मध्यम मार्ग काढावा, अन्यथा व्यापाऱ्यांमधील संयम संपला असून ते कधीही दुकाने उघडतील, असा इशारा देतानाच व्यापाऱ्यांच्या परिस्थितीचा आढावा पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला. संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्याकडे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासाठी निवेदन दिले. पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील व्यापारी या लॉकडाऊनसदृश्‍य परिस्थितीमुळे अडचणीत आला आहे. कर्जाचे हप्ते, भाडे, वीज बिल, कामगारांचे पगार व इतर खर्च व्यापाऱ्यांनी कसे करायचे? असे अनेक प्रश्‍न गेल्या वर्षापासून असताना आता कुठे व्यापारी त्याचा व्यवसाय सुरू करत असतानाच निर्बंधांच्या नावाखाली लॉकडाऊन केला. विनाकारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न होऊ नये, यासाठी सरकारने त्वरित निर्णय बदलावेत, अशी व्यापाऱ्यांची अपेक्षा असल्याचे निवंगुणे म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.