मुंबई – हैदराबादवरून मुंबईत बसमधून आलेले १६ किलो मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात महसूल गुप्तवार्ता संचालनालयाला (डीआरआय) यश आले आहे. जप्त करण्यात आलेल्या एमडीची किंमत सुमारे २४ कोटी रुपये असल्याची माहिती डीआरआयकडून देण्यात आली. या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली.
हैदराबादहून दोन प्रवासी मुंबईत अमली पदार्थांचा साठा घेऊन येत असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे डीआरआने संबंधित बसवर पाळत ठेवली होती. बसमधील संशयीत प्रवासी बाहेर पडल्यानंतर मंगळवारी पहाटे त्यांना ताब्यात घेऊन तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान त्यांच्याकडील बॅगेत पांढऱ्या रंगाचा पदार्थ आढळला.
तपासणीत ते एमडी असल्याचे निष्पन्न झाले. तपासणीनंतर आरोपींकडून १६ किलो एमडी जप्त करण्यात आले. आरोपींना मध्यस्थ व त्यांचा साथीदार मुंबईत भेटणार होते. त्यांच्याकडे एमडीची पाकिटे सुपूर्त करण्यात येणार होती, असे चौकशीत उघड झाले. या कारवाईनंतर डीआरआयने इतर आरोपींचाही शोध घेऊन मध्यस्थ व एमडी घेण्यासाठी आलेल्या तिघांना अटक केली.
याशिवाय त्याच्याकडून एक कोटी ९३ लाख रुपयांची रोख रक्कमही हस्तगत करण्यात आली. याप्रकरणी पाचही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.