शिवसेनेचा ‘शवसेना’ उल्लेख करत अमृता फडणवीसांची सरकारवर टीका

मुंबई : बिहारमध्ये एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवत पुन्हा एकदा राज्याच्या खुर्चीवर आपलाच हक्क मिळवला आहे. या निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून काम करणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सध्या या विजयामुळे कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.तर दुसरीकडे फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर परत निशाणा साधला आहे. यावेळी अमृता यांनी आपल्या ट्विटमध्ये शिवसेनेचा ‘शवसेना’ असा उल्लेख केला आहे.

अमृता यांनी देवेंद्र फडणवीसांनी एनडीएने बिहारमध्ये विजय मिळवल्यानंतर दिलेल्या मुलाखतीचा एक छोटा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये फडणवीसांनी शिवसेनेने कशाप्रकारे बिहारमधील निवडणुकीमध्ये खराब कामगिरी करत आपले हसे करुन घेतले आहे याबद्दल भाष्य केले आहे. त्याचप्रमाणे फडणवीस यांनी या मुलाखतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आधीतरी बिहारमध्ये काही जागा निवडून यायच्या मात्र आता तेही झालं नाही असे म्हणतं शिवसेनेबरोबर सध्या सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादीलाही टोला लगावला आहे. याचवरुन अमृता यांनी शिवसेनेने आपल्या साथीदारांना बिहारमध्ये ठार मारले अशी टीका ट्विटवरुन केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी, “महाराष्ट्र कुठे ही नेला असो पण बिहार योग्य ठिकाणी नेउन ठेवल्या बाबत धन्यवाद,” असे म्हणत बिहारमधील मतदारांचे आभार मानले आहेत.

बिहारमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेणाऱ्या शिवसेनेला बिहारच्या मतदारांनी नाकारल्याचे चित्र निकालामध्ये दिसून आलं. बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये ५० जागा लढवणाऱ्या शिवसेनेला भोपळाही फोडता आलेला नाही. शिवसेनेला ०.०५ टक्के मत मिळाली आहे. अनेक ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झाले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शिवसेनेपेक्षा नोटाला अधिक म्हणजेच १.७४ टक्के मतं मिळाली आहेत. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि शिवसेनेला एकत्र आणत महाविकास आघाडीची मोट बांधणाऱ्या राष्ट्रवादीलाही बिहारमध्ये फरसे यश मिळालेले नाही. राष्ट्रवादीला ०.२३ टक्के मते मिळाली आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.