नवी दिल्ली – जागतिक क्रिकेटमध्ये जर ऑस्ट्रेलियाप्रमाणे दबदबा प्रस्थापित करायचा असेल तर भारतीय महिला क्रिकेट संघातील आम्हा सर्व खेळाडूंना कणखर मानसिकता असणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिने व्यक्त केले.
महिला क्रिकेटला जेव्हापासून प्रारंभ झाला तेव्हापासून अन्य देशांपेक्षाही ऑस्ट्रेलियाच्या खेळाडू मानसिक सक्षम राहिल्या आहेत. सामन्यात कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तरी त्यांच्यावर दडपण दिसून येत नाही. सुरवातीच्या काळात भारतीय संघातील खेळाडू प्रत्यक्ष सामन्यात खेळताना मानसिक स्तरावर दबून गेल्यासारख्या वाटायच्या. आज ही परिस्थिती बदलली असली तरीही महत्त्वाच्या क्षणी विनाकारण दडपण हे खेळाडू का घेतात हा देखील मला प्रश्न पडतो, असेही झुलनने सांगितले.
सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला दडपणाखाली ठेवायचे व कोणत्याही स्थितीत सामना गमवायचा नाही हे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटचे सूत्र आहे. त्यामुळेच आज ते जागतिक महिला क्रिकेटवर वर्चस्व गाजवताना दिसतात. भारतीय संघ गेल्या पाच वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. आता जर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड अशा संघांची मक्तेदारी मोडून काढायची असेल तर भारतीय महिला क्रिकेटपटूंना मानसिकता कणखर बनविण्याशिवाय पर्यायच नाही, असेही तिने अधोरेखीत केले.
कर्णधार हरमनप्रीत हिच्या नेतृत्वाखाली यंदा भारतीय संघाने विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले मात्र, विजेतेपदापासून लांब राहावे लागले. इथे जर ऑस्ट्रेलियाचा संघ असता तर त्यांनी विजेतेपद निश्चितच मिळविले असते. त्यांचा संघ जेव्हा कोणतीही स्पर्धा खेळतो तेव्हा जर ते अंतिम फेरीत जातात तेव्हा कोणत्याही स्थितीत विजय प्राप्त करायचाच हेच लक्ष्य ठेवून खेळ करतात आणि 100 पैकी 90 वेळा ते जिंकतात देखील. हेच सूत्र भारतीय क्रिकेटने बाळगले तर जागतिक क्रिकेटवर भारतीय संघाची मक्तेदारी निर्माण व्हायला वेळ लागणार नाही, असा विश्वासही झुलनने व्यक्त केला.