मानसिक आरोग्य दिन हा जगभर 10 ऑक्टोबर रोजी साजरा केला गेला. या मागची महत्त्वाची भूमिका म्हणजे सर्वांना मानसिक आरोग्य म्हणजे काय याबाबत जाणीव निर्माण व्हावी व सर्वांचे मानसिक आरोग्य कुशल मंगल राहावे.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) यावर्षीची थीम ‘कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्याची ही वेळ आहे’ (It is Time to Prioritize Mental Health in the Workplace) अशी ठेवण्यात आली आहे. या थीमचा मुख्य उद्देश आहे की, कामाच्या ठिकाणी निर्माण होणार्या समस्या आणि त्यामुळे कर्मचार्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा त्याचा परिणाम. याबाबत संघटना/व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यामध्ये जागृती निर्माण व्हावी.
आधुनिक युग हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती कोणते ना कोणते काम (जॉब) करताना दिसून येते. परंतु प्रत्येक व्यक्तीला त्याच्या योग्यतेचे काम मिळेल असे नाही व प्रत्येक कामासाठी योग्य व्यक्ती मिळेल असेही नाही. त्यामुळे कामाच्या ठिकाणी अनेक समस्या निर्माण होतात व कळत-नकळत व्यवस्थापक व कर्मचारी यांचे मानसिक आरोग्य बिघडते. म्हणून मानसिक आरोग्य बिघडण्याची काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे.
1) कर्मचारी निवड – सर्वात महत्त्वाचे म्हणजे योग्य कामासाठी योग्य व्यक्ती व योग्य व्यक्तीसाठी योग्य काम, या दोन बाबींची निवड चांगली झाली तर व्यवस्थापक व कर्मचारी यांचे मानसिक आरोग्य कुशल मंगल राहील अन्यथा दोघांचेही मानसिक आरोग्य धोक्यात येईल.
2) वेतन – सध्याच्या युगात वेतन हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कारण व्यक्तीच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या नाहीत तर व्यक्तीला असमाधान निर्माण होते व व्यक्तीचे मानसिक आरोग्य खालावते.
3) व्यवस्थापन – एखाद्या संघटनेचे अथवा संस्थेचे व्यवस्थापन हे कर्मचार्यांच्या जीवनावर सकारात्मक व नकारात्मक प्रभाव पाडते. जर व्यवस्थापकाकडे योग्य ती कौशल्ये नसतील, तर व्यवस्थापनात योग्य पद्धतीने कामाचे नियोजन करता येणार नाही. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात व कर्मचार्याला चिंता निर्माण होऊन त्याचे मानसिक स्वास्थ्य बिघडते.
4) भौतिक सुविधा – आधुनिक युग हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे कर्मचार्याला कार्य करताना पुरेशा भौतिक सुविधा निर्माण करून देणे ही खूप महत्त्वाची बाब आहे. उदाहरणार्थ, पाण्याची सोय, टॉयलेटची सुविधा, योग्य व पुरेशा खोल्या त्याचबरोबर इंटरनेट, आधुनिक संगणक, प्रिंटर, प्रोजेक्टर व आधुनिक यंत्रसामग्री या सर्व भौतिक सुविधा पुरेशा असतील तर कर्मचारी आनंदाने काम करतील व संघटनेची भरभराट होईल. परंतु या सुविधांची कमतरता असेल तर कर्मचार्याला ताण निर्माण होईल व त्याचे मानसिक आरोग्य धोक्यात येईल.
5) आंतर वैयक्तिक संबंध – आंतर वैयक्तिक संबंध ही बाब संघटना व कर्मचारी यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. कारण संघटनेतील प्रत्येक व्यक्ती एकमेकांवर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांचे विचार, भावना व वर्तन यामध्ये समन्वय असणे खूप गरजेचे आहे. अन्यथा व्यवस्थापक व कर्मचारी यांचे आंतर वैयक्तिक संबंध दुरावलेले असतील तर त्याचा तोटा दोघांनाही होऊ शकतो.
6) कामाची विभागणी – अनेक संस्था/संघटनेमध्ये कामाची विभागणी योग्य पद्धतीने किंवा पारदर्शक झालेली दिसून येत नाही. त्यामुळे कर्मचार्यांमध्ये अनेक प्रकारचे हेवेदावे निर्माण होतात. त्यातूनच संघर्ष निर्माण होतो व व्यक्तीचे मानसिक स्वास्थ्य बिघडते. म्हणून जर व्यवस्थापकाने वार्षिक कामकाज नियोजन योग्य पद्धतीने केले, तर सर्व कर्मचारी योग्य पद्धतीने कामकाज करू शकतील व आनंदी राहतील.
7) जबाबदारीची जाणीव – अनेक संघटनांमध्ये व्यवस्थापक काही कर्मचार्यांना झुकते माप देतात. उदाहरणार्थ, अमुक अमुक व्यक्तीला हे काम देऊ नका, त्याला ते जमणार नाही. परंतु जेव्हा एखाद्या व्यक्तीला कोणतेच काम दिले जात नाही किंवा कमी काम दिले जाते तेव्हा त्या व्यक्तीचा कार्यभार हा दुसर्या व्यक्तींवर जबरदस्तीने लादला जातो. त्यामुळे दुसर्या व्यक्तीवर अतिरिक्त कार्यभार दिल्यामुळे त्या व्यक्तीचे शारीरिक व मानसिक आरोग्य ढासळते. त्यामुळे व्यवस्थापकाने ‘सर्व समभाव’ याप्रमाणे कार्यभाराचे वाटप करावे. तसेच सर्व व्यक्तींना त्यांची जबाबदारी समजून सांगावी.
8) कामाचे लक्ष्य – विशिष्ट कालावधीत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य संघटनेने दिलेले असल्यामुळे व अपुर्या सुविधांमुळे ते काम पूर्ण न झाल्यामुळे कर्मचार्यांच्या मनावरचा ताण वाढतो व त्याचे मानसिक आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे साधनसामग्रीचा विचार करून कर्मचार्यांना कार्य करण्यास सांगावे.
9) पूर्वनियोजित कामकाजात बाधा येणे – जेव्हा एखादा कर्मचारी एखादे काम करत असताना त्याला ते काम सोडून दुसरे काम करण्यास सांगितले जाते, त्यावेळी व्यक्तीचा मानसिक गोंधळ निर्माण होतो.
10) कामात बदल नसणे – एखादा कर्मचारी अनेक वर्षे एकाच प्रकारचे काम वारंवार करत असेल, तर त्याला त्या कामाची उबग येते व त्यातून त्या व्यक्तीला कामाचा मानसिक थकवा येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे काही कालावधीनंतर कामकाजामध्ये बदल केल्यामुळे ती व्यक्ती जास्त चांगले कार्य करेल व आनंदी राहील.
11) जोखीम – संघटनेमध्ये अथवा संस्थेमध्ये जोखीमीचे काम करताना जर कर्मचार्याचा अपघात झाला अथवा कायमस्वरूपीची दुखापत झाली आणि जर त्याला संघटनेकडून काहीच आर्थिक मदत मिळणार नसेल, तर अशावेळी कर्मचारी खूप ताणतणावात कार्य करत असतो. त्यामुळे जोखीम असणार्या ठिकाणी काम करणार्या व्यक्तीला आर्थिक मोबदला मिळेल अशी संघटनेने तरतूद केली पाहिजे.
थोडक्यात, विविध संघटना/व्यवस्थापक यांनी जर वरील मुद्द्यांचा विचार करून योग्य त्या उपाययोजना केल्या तर शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, औद्योगिक, क्रीडा, कला व बँकिंग इत्यादी क्षेत्रामधील ताणतणाव कमी होऊन कर्मचार्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्यास मदत होईल. तसेच जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेला विषय (थीम) ‘कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्याची ही वेळ आहे’ सार्थ ठरेल अशी अपेक्षा आहे.