पुरूषी साज

पायी वहाणा हाती काठी,
खांद्यावर घोंगडी,
नामा म्हणे ऐसे विठोबा,
त्यांच्या चरणी माथा ठेवी घडोघडी
महाराष्ट्राच्या मराठमोळ्या विठूरायाच्या पोशाखाचं वर्णन नामदेवांनी अगदी मऱ्हाटी भाषेत केलं आहे. पंढरीचा विठोबा हा सगळ्याच मराठी लोकांना आपला वाटतो कारण तो देव आणि भक्‍त यात भेदभाव करत नाही. विठोबाचं वर्णन केलेला हाच पोशाख सर्वसामान्य मराठी माणसाचाच अवतार आहे.

आज सगळीच माणसं सरसकट शर्ट पॅंट वापरतात त्यामुळे पुरुषांच्या वस्त्रांमध्ये अशी कोणती परंपरा आणि वैविध्य असणार आहे हा प्रश्‍न आपल्या सगळ्यांनाच पडतो. पण जरा खोलात जाऊन पाहिलं तर या शर्ट पॅंटपूर्वी आपल्याकडे पुरुषांच्याही वस्त्र-प्रावरणात भरपूर वैविध्य होतं हे लक्षात येतं. शिवाय यात जातीनिहाय, समाजातल्या स्थानानुसार आणि पेशानुसार अनेक प्रकार पडतात. ते समजून घेणं आज फारच कुतुहलाचं वाटतं. पण तरीही पुरुषांच्या वेशभुषेत काळानुसार फार वेगानं फरक झाला नाही हे मात्र मान्य करावंच लागेल.

या बाबतीतला एक प्रसंग फार बोलका आहे. इंग्रजांनी भारतावर दीडशे वर्षं राज्य केलं. तेव्हा व्हिक्‍टोरिया राणीला आपण ज्या भारतावर राज्य करतो त्यातल्या मऱ्हाटी प्रांतातले पुरुष पोशाख कसे करतात हे प्रत्यक्ष पहाण्याची इच्छा झाली. नेमकं त्याच दरम्यान आपल्या लोकहीतवादी गोपाळ हरी देशमुख यांचे ज्येष्ठ पुत्र कृष्णराव इंग्लंडमध्ये शिकायला गेले होते. तेव्हा राणीकडून त्यांना निरोप वजा आज्ञाच गेली, तुमचा पारंपरिक पोशाख आम्हाला पहायचा आहे. तेव्हा तसा पोशाख करुन आम्हाला भेटायला या! तेव्हा कृष्णरावांनी लागोलाग वडिलांना म्हणजेच लोकहितवादींना तसं पत्र पाठवलं. मग लोकहितवादींनी अगदी तलवार आणि पगडीसहीत कृष्णरावांच्या मापाचे कपडे तयार करुन इंग्लंडला पाठवून दिले! तो पोशाख चढवून मग कृष्णराव व्हिक्‍टोरिया राणीला भेटायला गेले. ही दंतकथा भासणारी हकीगत खरी आहे. त्या पोशाखातला कृष्णरावांचा फोटोही उपलब्ध आहे.

तर या सगळ्यावरून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे अंगरखा, शेला किंवा शाल, पगडी, धोतर किंवा चुणीदार पायजमा, पायात वहाणा हा वेश अगदी पूर्वीपासून आता आता पर्यंत तसाच होता. पुरुषांचा पोशाख कालपरत्वे फारसा बदलला नसला तरी त्यात मुळातच अनेक प्रकार आणि उपप्रकार होते. स्त्रियांच्या डोक्‍यापासून पायापर्यंत साडी असल्यामुळे त्यांच्या पोशाखांमध्ये एकावेळी अनेक वस्त्र धारण करायचा प्रश्‍न नव्हता. पण पुरुषांच्या वस्त्राचा विचार केला तर डोक्‍यावर पगडी, मुंडासं, फेटा येतो, अंगात अंगरखा, बाराबंदी, बंडी, गंजी, कमरेला धोतर, पंचा, लुंगी, विजार किंवा पायजमा आणि पायात वहाणा, पायताण किंवा जोडे असा होता.

कमरेखालच्या वस्त्राला जामा म्हणतात आणि कमरेवरच्या वस्त्राला निमा म्हणतात, यावरुन जामानिमा हा शब्दप्रयोग रुढ झालेला आहे हाही यामागचा गमतीचा भाग आहे. या कपड्यांबरोबरच खांद्यावर घोंगडी, शाल, शेला किंवा उपरणं घेण्याची प्रथा होती. शिवाय बहुतांशी पुरूष या वस्त्रांबरोबरच आपापल्या पेशाप्रमाणे सोबत शस्त्रास्त्रंही बाळगत असायचे. म्हणजे राजे महाराजे कमरपट्ट्यालाच तलवार अडकवायचे, काही बिचवा, वाघनखं तर काहीजण कट्यार बाळगायचे. तर शेतात काम करणारे कुणबी लोक कमरेला खुरपं किंवा विळा बाळगायचे; तसा तो अजूनही बाळगतात. काही लोक टिळकांसारखे हातात काठी किंवा छत्री बाळगायचे.

पुरुषांच्या वेषभूषेच्या अलंकारांबद्दल आपण स्वतंत्रपणे पुढे बोलूच. पण या सगळ्यातून एक गोष्ट परत परत जाणवत रहाते ती म्हणजे स्त्रियांचा पोशाख दागिन्यांशिवाय पूर्ण होत नाही आणि पुरुषांचा पोशाख शस्त्रांशिवाय पूर्ण होत नाही हे खरं कारण महाराष्ट्र हा मराठी योद्धांचा देश आहे, कारण महाराष्ट्र हा राकट, कणखर दगडांचा देश आहे.

अमृता देशपांडे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here