मासिक पाळी, कुरमाघर आणि स्पर्श

गडचिरोली भागात पाळीच्या दिवसात स्त्रीला वेगळ्या खोलीत राहायला जावे लागते. त्याला म्हणतात कुरमाघर. ही खोली मुख्य घरापासून वेगळी असते. खोली कसली… नुसत छप्परच ते! ‘स्पर्श’ या संस्थेने कुरमाघरविषयक अभ्यास करून एक अहवाल दिला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, कुरमाघरमधे राहात असताना आजारी पडल्यावर कोणताही उपचार होऊ न शकल्यामुळे आजवर तेरा बायकांचे बळी गेलेले आहेत. इतके होऊन देखील, कायदा, प्रशासन ढिम्म आहे. दर महिन्याला शेकडो आदिवासी स्त्रियांना काही दिवस बहिष्कृताचे जिणे जगायला लावणाऱ्या या क्रूर प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी कायद्याचाच बडगा उगारायला हवा. निराधार अवस्थेत जगणाऱ्या या स्त्रियांना “स्पर्श’ या एकमेव संस्थेचा आधार आहे.

अठ्ठावीस मे हा मासिक पाळी स्वच्छता जनजागृती दिवस म्हणून जगभरात मानला जातो. या निमित्ताने भारतात मासिक पाळीतील स्वच्छतेविषयी कितपत जागरूकता आहे याचा विचार केला, तर निराशाच पदरी पडते. पुरुषप्रधान भारतीय समाजात पाळी येणे हीनपणाचे समजले जाते. सुरुवातीला तिला विश्रांती मिळावी म्हणून बाजूला बसवण्याची प्रथा सुरू झाली. मात्र पुढे पाळीच्या या काळात ती चक्क अस्पृश्‍य, अपवित्र मानली जाऊ लागली. अनेक बंधने तिच्यावर लादली जाऊ लागली. काही मंदिरांमधे स्त्रियांना दर्शन घेण्यास बंदी आहे. मासिक पाळी असण्याच्या वयात काही ठिकाणी स्त्रियांना देवळात प्रवेश करण्यास मज्जाव आहे. ज्या गोष्टीमुळे आज मानवजात अस्तित्वात आहे, त्याच गोष्टीविषयी एवढा तिरस्कार मासिक पाळी हा निसर्गधर्म. नव्या जिवाला जन्म देण्याच्या प्रक्रियेतला महत्त्वाचा भाग. तो वाईट कसा? अपवित्र कसा?

गडचिरोली भागात तर पाळीच्या दिवसात स्त्रीला वेगळ्या खोलीत राहायला जावे लागते. त्याला म्हणतात कुरमाघर. ही खोली मुख्य घरापासून वेगळी असते. मुळात हा समाज स्त्रीप्रधान संस्कृतीचा. पण त्यातला केवळ सोयीचा भाग समाजाने स्वीकारला. म्हणजे कष्टाला बायका पुढे. अर्थार्जनाची जबाबदारी त्यांची. पण काही काळ तरी त्यांना अपवित्र मानलं जातंच. गळके, गवती छप्पर, ओलावा आलेली जमीन,दार म्हणजे फक्त बांबूच्या काड्यांचे कवाड. तट्ट्याचा तात्पुरता आडोसा असलेली बाथरुम. सगळ्या टाकाऊ गोष्टी या कुरमाघरात असतात. वीज सहसा नसतेच. कुबट वातावरण. पावसाचे दिवस असतील तर तिथे राहणाऱ्या स्त्रियांचे हाल विचारायलाच नकोत. तिथे राहणाऱ्या बाईला काही त्रास होत असेल, कोणाची मदत लागली, आजारी पडली तरी तिच्याजवळ जाणार कोण? अस्पृश्‍यच असते ती त्या काळात. उन्हापावसापासून, थंडीपासून बचाव नाही. बाकी काही चहाकॉफी सोडाच, पण जेवणदेखील मिळणे दुरापास्त होते. डुकरं, कुत्री, सापविंचू यांची भीती… त्यामुळे झोप नाही.

“स्पर्श’ या संस्थेने कुरमाघरविषयक अभ्यास करून एक अहवाल दिला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, कुरमाघरमधे राहात असताना आजारी पडल्यावर कोणताही उपचार होऊ न शकल्यामुळे आजवर तेरा बायकांचे बळी गेलेले आहेत. इतके होऊन देखील, कायदा, प्रशासन ढिम्म आहे. कारण त्यांच्याकडे मुळात अशी काही माहितीच नाही. दर महिन्याला शेकडो आदिवासी स्त्रियांना काही दिवस बहिष्कृताचे जिणे जगायला लावणाऱ्या या क्रूर प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी कायद्याचाच बडगा उगारायला हवा. निराधार अवस्थेत जगणाऱ्या या स्त्रियांना “स्पर्श’ या एकमेव संस्थेचा आधार आहे. “स्पर्श’ने कुरमाघरांचा अभ्यास करून एक अहवाल तयार केला आणि सरळ राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला पाठवला. आयोगाने राज्य शासनाकडे याबाबतचा अहवाल मागितला. या प्रथेवर उपाय सुचवण्यासाठी नेहमीप्रमाणे एक समिती नेमण्यात आली. त्यास आता चार वर्षे उलटून गेली. अद्याप या समितीची एकही बैठक झालेली नाही.

इथे राहणाऱ्या मुली आता शिकल्या आहेत. अभ्यासक्रमातून मासिक पाळीचे महत्त्व त्यांना कळले आहे. कुरमाघर ही प्रथा चुकीची आहे हे त्यांना कळते पण ग्रामसत्तेपुढे त्यांचे काही चालत नाही. इतकेच काय, तिथे जनजागृती करण्यासाठी “स्पर्श’ संस्थेने नेमलेल्या कार्यकर्त्या,गावातील अंगणवाडी सेविका या साऱ्या सुशिक्षित स्त्रियांनाही कुरमाघरमधे राहावे लागते. खरे तर भारतीय राज्यघटनेनुसार कोणत्याही कारणासाठी अस्पृश्‍यता पाळणे हा फौजदारी गुन्हा आहे. पण रीत, प्रथा, परंपरा या नावाखाली आपण राजरोस निरपराध स्त्रियांना दरमहा अशी क्रूर शिक्षा देत आहोत. शासनाकडून काही होत नसेल तर बाकीच्या समाजाने त्यासाठी आवाज उठवायला हवा. अंधश्रद्धेतून बाहेर पडायला हवे. स्त्रियांच्या आरोग्यासाठी, न्यायासाठी त्यांच्यामागे ठामपणे उभे रहायला हवे. जेव्हा कुरमाघरची प्रथा बंद होईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने मासिक पाळीविषयी जागृती झाली आहे असे आपण मानले पाहिजे. पुन्हा 28 मे साजरा करण्याची पाळी येऊच नये हेच या दिवसाचे खरे यश म्हणावे लागेल.

– माधुरी तळवलकर

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.