‘दिलवाले दुल्हनिया…’च्या स्मृती लंडनमध्ये पुतळ्याच्या रूपात

लंडन – शाहरुख खान आणि काजोल यांच्या गाजलेल्या “दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ या सिनेमाची जादू अजूनही सिनेरसिकांच्या मनावर कायम आहे. या सिनेमातील लव्ह स्टोरी जेवढी हिट होती, त्यापेक्षाही त्यातील संगीत अधिक हिट झाले होते. याबरोबर शाहरुख आणि काजोलची ‘ऑनस्क्रीन केमिस्ट्री’ही प्रेक्षकांना खूप आवडली होती.

यशराज फिल्म्सची निर्मिती असलेला ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ 20 ऑक्‍टोबर 1995 रोजी रिलीज झाला होता. या सिनेमाद्वारे आदित्य चोप्रा यांनी दिग्दर्शनामध्ये पदार्पण केले होते. या सिनेमाला 25 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे लंडनमधील लेसेस्टर स्क्‍वेअरमध्ये या सिनेमातील एका दृश्‍याचा ब्रॉन्झचा पुतळा उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याचे अनावरण 2021 साली केले जाणार आहे.

लंडन शहराच्या मध्यभागी असलेल्या चौकात चित्रपटामधील दृश्‍यांच्या आकर्षणाचा भाग म्हणून ‘डीडीएलजे’ पुतळा असेल, असे “हार्ट ऑफ लंडन बिजनेस अलायन्स’ने सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या चौकात गाजलेल्या सिनेमांमधील काही दृश्‍यांवर आधारलेली शिल्पे साकारलेली आहेत. त्यामध्ये लॉरेन हार्डी, हॅरी पॉटर, मिस्टर बीन आदी गाजलेल्या व्यक्तिरेखांचे पुतळेही आहेत.

‘दिलवाले…’मध्ये शाहरुख आणि काजोल पहिल्यांदा समोरासमोर येतात, तेंव्हाच्या दृश्‍याचा पुतळा या चौकात उभारण्यात येणार आहे. पुढच्या वर्षी या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे आणि तेंव्हा शाहरुख आणि काजोल दोघेही उपस्थित राहू शकतील, असा अंदाज आयोजकांनी व्यक्‍त केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.