चाळकवाडीत साकारले बैलगाडा शर्यतीचे स्मारक

विजय चाळक
आळेफाटा – ग्रामीण भागाच्या संस्कृतीत रुजलेली बैलगाडा शर्यत पाच वर्षांपूर्वी बंद करण्यात आली. मात्र, ही शर्यत आणि ही परंपरा आळेफाटा (ता. जुन्नर) येथील चाळकवाडीतील शेतकऱ्यांच्या मनात इतकी रुजली आहे, की त्यांनी या शर्यतीच्या आठवणी स्मारकाच्या रूपात साकारल्या आहेत.

चाळकवाडी (ता. जुन्नर) येथील शेतकरी कै. गणपत शंकर सोनवणे हे एक बैलगाडा मालक. त्यांचे बैलांवर आणि बैलगाडा शर्यतीवर प्रचंड प्रेम. 2014 मध्ये बैलगाडा शर्यती बंद झाल्या आणि त्यानंतर सोनवणे यांचे निधन झाले. आपल्या वुडिलांचे बैलगाडा शर्यतीवर असलेले प्रचंड प्रेम पाहून त्यांची मुले मकरंद आणि नितिन यांनी बैलगाडा शर्यतीचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी सुमारे दीड लाख रुपये खर्च करून 15 ऑगस्ट 2015 ला घरासमोरच बैलगाडा शर्यतीचे स्मारक उभे करून बैलगाडा शर्यतीची आठवण जोपासण्याचे काम केले आहे. आज हेच स्मारक बैलगाडा शर्यतींना प्रेरणादायी ठरत आहे बैलगाडा शर्यत ग्रामीण भागातील यात्रांचे आकर्षण असायचे. मात्र उच्च न्यायालयाने या शर्यतींवर बंदी घातल्यावर या शर्यती बंद झाल्या.

बैलगाडा शर्यतीमध्ये खिल्लारं जातीचे बैल वापरले जातात. यामुळेच या जातीच्या जनावरांच्या किमती काही लाखांत आहेत. स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी कर्नाटकातील संपगावात युध्द मोहीम करून तेथील 3 हजार बैल स्वराज्यात रायगडावर आणल्याची इतिहासात नोंद आहे. खिल्लारंला ही परंपरा आहे. मागील पाच वर्षांपासून बैलगाडा शर्यतीवर बंदी असल्याने खिल्लारंचं अस्तित्व धोक्‍यात आले आहे. मात्र, ग्रामीण संस्कृतीत लोकांच्या मनातून ही शर्यत गेलेली नाही, म्हणूनच एका शेतकऱ्याने उभारलेले शर्यतीचे स्मारक प्रेरणादायी ठरणारे आहे

संदीप बोदगे, अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटना, पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)