लक्षवेधी : सामंजस्य करार; तरीही गाफील राहू नये!

-ब्रिगे. हेमंत महाजन (निवृत्त)

भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये मॉस्को येथे झालेल्या सामंजस्य करारानंतर प्रत्यक्ष ताबारेषेवर शांतता आहे. मात्र, प्रत्यक्ष ताबारेषेवरून चीनने सैन्य अद्याप मागे घेतले नसल्याने “हिवाळी युद्धा’ची तयारी भारतीय लष्कराने केली आहे.

पाच मेपासून भारतीय आणि चिनी सैन्य मोठ्या संख्येने एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. लडाखमधील मिलिटरी स्टॅंड ऑफ कधी संपेल हे सांगता येत नाही, या भागात पारंपरिक युद्ध होऊ शकते असे काहींना वाटते.

युद्धामध्ये महत्त्वाचे दोन घटक असतात, एक सैनिक आणि दुसरे त्यांची शस्त्रे. शस्त्रास्त्रांचा विचार केला तर चिनी शस्त्रास्त्रे आधुनिक आहेत. भारतीय लष्कराकडे असलेल्या शस्त्रांपेक्षा जास्त आधुनिक शस्त्रे चिनी सैनिकांकडे आहेत. परंतु सैनिक आणि सैन्याचे नेतृत्व करणारे अधिकारी यांचा विचार करता त्यात भारताची नक्‍कीच सरशी होणार आहे. यामागे अनेक कारणे आहेत. भारतीय सैन्याला लढण्याचा रोजच अनुभव आहे.

सद्यपरिस्थितीही दरवर्षी भारतीय लष्करातील साडेतीनशे ते चारशे सैनिक हे दहशतवादी विरोधी अभियान आणि एलओसीवर आपले रक्‍त सांडवत असतात. अर्थात, आपल्यापेक्षा जास्त नुकसान आपले सैन्य पाकिस्तानचे करते. कारगील युद्धाशिवाय आपण सियाचीन ग्लेशिअरमध्येही अत्यंत उंचावर लढाई करत आहोत त्यामुळे आपल्या सैन्याला युद्धाचा अनुभव आहे. चीनने एकच युद्ध 1978 साली व्हिएतनामशी केले, त्यात त्यांचा पराभवही झाला.

1967 सालामध्ये सिक्‍कीम डोंगराळ सीमेवर भारत आणि चीन यांच्यादरम्यान जी लढाई झाली त्यात चारशेहून अधिक चिनी सैनिकांना मारले होते, तर 70 भारतीय सैनिकांचे रक्‍त सांडले. 1999 साली कारगील युद्धामध्ये अतिउंचावर युद्धात आपण पाकिस्तानला हरवले. कारगील युद्धात लढलेले अधिकारी आजही लष्करात आहेत. उदा., नॉर्थन कमांडचे मुख्य लेफ्टनंट जनरल जोशी यांना कारगील युद्धामध्ये वीरचक्र देऊन गौरवण्यात आले होते. अशा प्रकारचा अनुभव चिनी अधिकाऱ्यांकडे अजिबात नाही.

युद्धभूमीवर कठीण परिस्थितीला तोंड देण्याची शक्‍ती महत्त्वाची

सध्या चीनबरोबरचा संघर्ष हा पूर्व लडाखमध्ये होत आहे. या युद्धभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा फारसा उपयोग होत नाही. इथल्या सैनिकांमध्ये ताकद, सहनशीलता, वेगवेगळ्या प्रकारच्या कठीण परिस्थितीला तोंड देण्याची शक्‍ती, कठीण परिस्थितीत तग धरण्याची क्षमता या गुणांची गरज आहे. भारतीय सैन्यात हे गुण आढळतात. आपले बहुतांश सैनिक खेड्यागावांतून येतात. ताकद, चपळाई, सहनशीलता या गुणांची खाण त्यांच्यात आहेच. 

त्याव्यतिरिक्‍त भारतीय सैनिकांचे प्रशिक्षण अत्यंत कठीण असते. तुलनेत चिनी सैनिक एका वर्षाचे प्रशिक्षण घेतात. त्यात 3 महिन्यांचे प्रशिक्षण हे साम्यवादी पक्षाचे उत्तम कार्यकर्ते कसे व्हावे हे असते. भारतीय सैनिक 15 वर्षे सेवा करतात, बरेचजण 18 व्या वर्षी सैन्यात भरती होतात, तर 35 व्या वर्षी निवृत्त होतात. त्यानंतर आयुष्यभर त्यांना पुरेसे निवृत्तीवेतन मिळते जे चिनी सैनिकांना मिळत नाही. त्यामुळे भारतीय सैन्य कोणतेही काम करण्यासाठी, देशासाठी प्राण त्यागण्यास तयार असतात. तुलनेत चिनी सैनिक हे प्रशिक्षण घेऊन खूपच कमी वर्षे सैन्यात असतात. त्यामुळे सैन्यातून बाहेर पडल्यावर रोजीरोटीसाठी काय कमवायचे याची काळजी त्यांना असते.

चिनी सैन्यात अनेक दुर्गुण

चिनी सैन्यात भ्रष्टाचाराचे प्रमाण अधिक आहे. सैनिक आणि अधिकारी यांच्यात दुरावा आहे. त्यामुळे अनेक चिनी बटालियनमध्ये खटका उडतो. सैनिक आणि अधिकारी यांच्यात सुसंवाद होत नाही. परंतु भारतीय सैन्याधिकारी आणि सैनिक यांच्यातील संबंध अत्यंत उत्तम आहेत, निवृत्त झाल्यानंतरही अधिकारी, सैनिक एकमेकांशी संबंध ठेवून असतात. एखाद्या बटालियन किंवा रेजिमेंटमध्ये काही काळ एकत्र असतात. ते आपल्या बटालियन किंवा रेजिमेंटला स्वतःचे दुसरे घरच समजतात. पूर्ण आयुष्यभर त्यांची रेजिमेंट, बटालियन हीच ओळख असते. ही मैत्री शेवटपर्यंत सुरू असते.

आपल्याकडे डोंगराळ भागात राहणाऱ्या अनेक जमाती जसे गढवाली, डोगरा, गोरखा आहेत. त्यांनी त्यांचे आयुष्य डोंगराळ भागातच काढलेले असते. भारतीय लष्करातील रेजिमेंट या लढाऊ जातीजमातींवर आधारित आहेत. या जमातींनी शेकडो वर्षे युद्ध लढली आहेत. मराठा, शीख, जाट, राजपूत अशा विविध रेजिमेंट्‌स आहेत. अशा रेजिमेंट्‌स चिनी सैन्यात नाही. चिनी सैनिकांची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे सत्तर टक्‍के चिनी सैनिक हे एकल कुटुंबातील आहेत. चीनच्या लोकसंख्या नियंत्रण कायद्याचा परिपाक म्हणून एका कुटुंबात एकच मूल असल्याने त्यांना युवराजासारखे वाढवण्यात आले. परिणामी अनेक वाईट सवयी काही चिनी सैनिकांमध्ये दिसून येतात.
लढण्याची गरज पडू नये म्हणून चीनने भारताला वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय कायद्यात अडकवून भारतीय सैन्याच्या वापरावर बंधने घातली. आता ती बंधने दूर करण्यात आली आहेत. चिनी सैन्याचा दर्जा वाढवण्यासाठी चिनी अधिकाऱ्यांनी विशेष प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात फारसे यश मिळालेले नाही, असे दिसते.

युद्धजन्य परिस्थितीत भारतीय सैनिकांचे नेतृत्व सर्वात पुढे

भारतीय सैन्याची सर्वात मोठी ताकद आहे, त्यांचे अधिकारी. अधिकाऱ्यांची परंपरा आहे की, ते युद्धजन्य परिस्थितीत आपल्या सैनिकांचे नेतृत्व सर्वात पुढे राहून करतात. त्यामुळेच दरवर्षी अनेक सैन्याधिकारी देशासाठी प्राणाचे बलिदान देतात. त्यांचे बलिदान व्यर्थ जात नाही. कारण त्यांच्या पराक्रमामुळे देशाला विजय मिळतो. अधिकाऱ्यांचे नेतृत्व नसेल तर सैनिक आपल्या पूर्णक्षमतेने लढू शकत नाहीत. सैनिकांना लढण्यासाठी मिळणारे प्रोत्साहन, आक्रमकता ही अधिकाऱ्यांमुळेच येते, ह्याचा चिनी सैन्यामध्ये अभाव आहे. भारतीय सैनिक, अधिकारी यांची देशासाठी हौतात्म्य पत्करणाची उर्मी यामध्ये आपण चिनी सैनिकांच्या अनेक पावले पुढे आहोत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.