नवी दिल्ली – नेमून दिलेल्या मुदतीत निवडणूक न घेतल्याने जागतिक कुस्ती महासंघाने भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व रद्द केले आहे. जागतिक महासंघाने 45 दिवसांच्या मुदतीत भारतीय महासंघाला निवडणुका घेण्याची सूचना केली होती. मात्र, निवडणुकीच्या एकच दिवस आधी हरियाणा न्यायालयाने निवडणुकांवर स्थगिती दिल्याने या निवडणुका होऊ शकल्या नाहीत.
मात्र, तो महासंघाचा अंतर्गत प्रश्न असून, त्यांनी नेमून दिलेल्या मुदतीत निवडणुका घेतल्या नसल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे जागतिक महासंघाने म्हटले आहे.
भारतीय कुस्ती मासंघाची निवडणूक 12 ऑगस्ट रोजी होणार होती. मात्र, पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने मतदानाच्या एक दिवस आधी निवडणुकीला स्थगिती दिली होती. आसाम उच्च न्यायालयानेही महासंघाच्या निवडणुकीला स्थगिती दिली आहे.
यापूर्वीदेखील 11 जुलै रोजी निवडणुका होणार होत्या. मात्र, आसाम कुस्तीगीर संघटनेने आपल्या मान्यतेबाबत न्यायालयात धाव घेतली. त्याच्या सुनावणीवर आसाम उच्च न्यायालयाने निवडणुकीला स्थगिती दिली होती. त्यानंतर ऑगस्टमध्येही निवडणुका होऊ शकल्या नाहीत.
भारतीय कुस्तीगीर महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांच्यासह अनेक कुस्तीपटूंनी महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत आंदोलन केले होते.
हे आंदोलन तब्बल पाच महिने सुरू होते. त्यानंतर क्रीडा मंत्रालयाने महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना निलंबित केले. पदाधिकाऱ्यांना निलंबित केल्यानंतर महासंघाचे काम भारतीय ऑलिम्पिक संघटनेने नियुक्त केलेली हंगामी समिती पहात होती.
महासंघाच्या निवडणुका 12 ऑगस्टला होणार होत्या. त्यात अध्यक्षपदासाठी चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अध्यक्षपदासाठी एका महिलेनेही अर्ज दाखल केला होता. अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल करणाऱ्या संजय सिंह यांच्याबाबत वाद निर्माण झाला होता. ते ब्रिजभूषण यांच्या मर्जीतील सहकारी मानले जातात. त्यामुळे अनेक कुस्तीपटूंनी त्यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला होता.
नामुष्कीला सामोरे जावे लागणार
जागतिक महासंघाने भारतीय महासंघाचे सदस्यत्व रद्द केल्यामुळे आता देशातील कुस्तीपटूंना नामुष्कीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आगामी जागतिक विजेतेपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू भारताच्या ध्वजाखाली खेळू शकणार नाहीत. येत्या 16 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रतेसाठीच्या या स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना जागतिक महासंघाच्या ध्वजाखाली खेळावे लागणार आहे.
हंगामी समिती विनंती करणार
जागतिक महासंघाने घेतलेला हा निर्णय अत्यंत कठोर असून, त्यामुळे भारतीय कुस्तीपटूंवर अन्याय होणार आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी आणखी काही दिवसांची मुदत देण्याची तसेच सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती जागतिक महासंघाला करण्यात येणार असल्याचे भारतीय कुस्तीगीर महासंघाचे कामकाज पाहात असलेल्या हंगामी समितीने म्हटले आहे.