नवी दिल्ली – पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) १३,८५० कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील फरार उद्योगपती मेहुल चोक्सी सध्या बेल्जियमच्या अँटवर्प शहरात आपली पत्नी प्रीती चोक्सीसोबत राहत असल्याचे ‘असोसिएट्स टाइम्स’च्या अहवालातून समोर आले आहे. प्रीती ही बेल्जियमची नागरिक आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी बेल्जियम सरकारशी संपर्क साधला असून, ही प्रक्रिया सुरू झाल्याचे या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
अँटिग्वावरून बेल्जियमपर्यंतचा प्रवास –
गुजरातचा हा हिरे व्यापारी आतापर्यंत कॅरिबियन बेट राष्ट्र असलेल्या अँटिग्वा आणि बार्बुडामध्ये राहत असल्याचे मानले जात होते. मात्र, अँटिग्वाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी १९ मार्च रोजी एएनआयला सांगितले की, चोक्सी वैद्यकीय उपचारासाठी देशाबाहेर गेला आहे, तरीही तो अँटिग्वाचा नागरिक कायम आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) यांनी त्याच्यावर बँक घोटाळ्याचा आरोप ठेवला आहे.
बेल्जियममध्ये ‘F रेसिडेन्सी कार्ड’-
६५ वर्षीय चोक्सी सध्या बेल्जियममध्ये १५ नोव्हेंबर २०२३ रोजी मिळालेल्या ‘F रेसिडेन्सी कार्ड’वर राहत आहे. हे कार्ड त्याला त्याच्या बेल्जियन पत्नीच्या मदतीने मिळाले आहे. या कार्डाद्वारे दुसऱ्या देशातील नागरिकाला बेल्जियममध्ये काही अटींसह आपल्या जोडीदारासोबत राहण्याची परवानगी मिळते. ‘असोसिएट्स टाइम्स’च्या मते, चोक्सीने बनावट कागदपत्रांचा वापर करून ही निवास परवानगी मिळवली आणि भारतात प्रत्यार्पण टाळण्याचा प्रयत्न केला आहे.
युरोपातील मुक्त संचाराची शक्यता –
चोक्सीने भारतीय नागरिकत्व सोडलेले नाही. जर त्याची तात्पुरती बेल्जियन निवास परवानगी कायमस्वरूपी झाली, तर त्याला युरोपातील देशांमध्ये मुक्त संचाराची मुभा मिळू शकते, ज्यामुळे भारताला त्याच्यावरील प्रत्यार्पणाची कोंडी आणखी कठीण होऊ शकते. अहवालानुसार, तो स्वित्झर्लंडमधील हिर्सलँडेन क्लिनिक आऊ येथे कर्करोगाच्या उपचारासाठी जाण्याची शक्यता आहे. मानवतावादी कारणांचा आधार घेऊन भारतात परतण्यास नकार देण्याचा त्याचा विचार असल्याचे दिसते.
फरार ते बेल्जियम –
चोक्सी जानेवारी २०१८ मध्ये PNB घोटाळा उघडकीस येण्यापूर्वी भारतातून पळाला होता. मे २०२४ मध्ये त्याने मुंबईतील विशेष न्यायालयात सांगितले की, “माझ्या नियंत्रणाबाहेरील कारणांमुळे मी भारतात परतू शकत नाही, त्यामुळे मला ‘फरारी आर्थिक गुन्हेगार’ म्हणता येणार नाही.” ED ने त्याला समन्स टाळल्याबद्दल आणि मालमत्ता जप्त करण्यासाठी त्याला फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याची मागणी विशेष न्यायालयात केली होती.
अँटिग्वातील गूढ गायब ते डोमिनिका –
मे २०२१ मध्ये चोक्सी अँटिग्वातून गायब झाला होता, तेव्हा त्याला भारतीय सरकारने पळवले असल्याची अफवा पसरली होती. मात्र, तो डोमिनिका या दुसऱ्या कॅरिबियन बेट राष्ट्रात सापडला, ज्याने ही अफवा खोटी ठरली. डिसेंबर २०२४ मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सांगितले की, चोक्सीसारख्या वॉन्टेड व्यक्तींच्या २२,२८० कोटी रुपयांच्या मालमत्तेची पुनर्स्थापना किंवा विक्री करून कर्ज परतफेड केली गेली आहे.
निरव मोदीचीही लढाई –
चोक्सीचा जवळचा नातेवाीक निरव मोदी, जो या घोटाळ्यातील आणखी एक आरोपी आहे, भारतातून पळून गेल्यानंतर ब्रिटनमध्ये प्रत्यार्पणाविरुद्ध कायदेशीर लढाई लढत आहे. चोक्सी आणि मोदी दोघांवरही CBI आणि ED चा कडक पहारा आहे, आणि आता बेल्जियममधून चोक्सीला परत आणण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे.