अँटिगुआ – भारतातील बॅंकांचे कर्जबुडवून अँटिगुआ देशाचे नागरीकत्व घेतलेला भारतातला हिरेव्यापारी मेहुल चोक्सी याचे आमच्या देशाचे नागरीकत्व रद्द करून त्याला त्याच्या देशात परत पाठवण्यात येईल अशी घोषणा अँटिगुआचे पंतप्रधान गॅस्टोन ब्राऊन यांनी केली आहे. त्याला आपल्यावरील कारवाईबाबत कायदेशीर दाद मागण्याचा अधिकार आहे त्याची ती प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर त्याचे नागरीकत्व रद्द केले जाईल असे अँटिगुआच्या पंतप्रधानांनी म्हटल्याचे वृत्त त्या देशातील काही माध्यमांनी दिले आहे. पंजाब नॅशनल बॅंकेला 13 हजार 400 कोटी रूपयांना फसवल्याच्या प्रकरणात मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी हे दोन प्रमुख आरोपी आहेत आणि त्यांना ताब्यात घेण्याचे प्रयत्न भारताच्या ईडीने हाती घेतले आहेत.
त्याच्या संबंधात पंतप्रधान ब्राऊनी यांनी म्हटले आहे की, आम्ही आमच्या देशात आर्थिक गुन्हे करून पळून आलेल्यांना आश्रय देतो असे चित्र निर्माण होता कामा नये यासाठी आम्ही त्याला भारतात परत पाठवून देऊ. तो आर्थिक गुन्हेगार आहे. पण आमच्या देशात गुन्हेगारालाहीं मानवाधिकार आहेत. त्यानुसार त्याला आपल्यावरील कारवाईसंबंधात येथील कोर्टात दाद मागण्याचा अधिकार आहे. ती प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर त्याला आम्ही भारतात परत पाठवून देऊ असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान आपल्यावरील उपचार पुर्ण झाल्यानंतर आपण स्वत: भारतात परत जाऊ असे चोक्सी याने म्हटल्याचे सांगण्यात येत आहे.