श्रीनगर – जम्मू काश्मीरमधील स्थानबद्ध केलेल्या नेत्यांपैकी प्रमुख नेत्या, जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना आज तात्पुरत्या तुरुंगातून घरी हलवण्यात आले. गेल्या वर्षी 5 ऑगस्टला जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर मेहबुबा मुफ्ती यांना प्रथम प्रतिबंधात्मक कोठडीमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर या वर्षी 6 फेब्रुवारीला त्यांना सामाजिक सुरक्षा कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्यात आले होते.
आज त्यांना मौलाना आझाद रस्त्यावरील फेअरव्ह्यू गुपकर रोडवरील सरकारी निवासस्थानी हलवण्यात आले. मुफ्ती यांच्या घराचीच व्यवस्था तात्पुरत्या कारागृहाप्रमाणे करण्यात आली आहे. त्यानंतरच मेहबुबा मुफ्ती यांना त्यांच्या निवासस्थानी हलवण्यात आले.
नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मेहबुबा मुफ्ती यांच्या सुटकेची मागणी केली आहे. मुफ्ती यांना तात्पुरत्या तुरुंगातून कडेकोट बंदोबस्तातील निवासस्थानी हलवणे हा केवळ दिखावा असल्याचे अब्दुल्ला म्हणाले.