नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी सोमवारी येथे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. सोनियांच्या निवासस्थानी झालेल्या त्या भेटीमुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
भाजपच्या विरोधात राजकीय लढा देण्यासाठी एकत्र येण्याचा सूर विरोधकांच्या गोटातून आळवला जात आहे. अशात झालेल्या सोनिया-मेहबुबा भेटीचे महत्त्व वाढले आहे. देशातील राजकीय सद्यस्थिती आणि जम्मू-काश्मीरमधील स्थिती यांविषयी त्यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. विरोधकांच्या संभाव्य आघाडीतील कॉंग्रेस महत्त्वाचा घटक असल्याची भूमिका मेहबुबा काही दिवसांपासून मांडत आहेत. नुकतीच त्यांनी कॉंग्रेसची तोंडभरून स्तुती करताना भाजपवर टीकेची झोड उठवली.
आतापर्यंत कॉंग्रेसमुळेच देश सुरक्षित राहिला. त्याउलट, भाजपला आणखी पाकिस्तान बनवायचे आहेत, असे त्यांनी म्हटले होते. जम्मू-काश्मीरमध्ये सध्या मतदारसंघ फेररचनेची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर तिथे विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळेही या भेटीला महत्व आहे.