श्रीनगर – पीपल्स डेमोक्रॅटीक पक्षाच्या नेत्या आणि जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचे दहशतवाद्यांशी संबंध होते अशा आशयाचा आरोप राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयने एका प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्रात केला आहे.
एनआयने काश्मीरमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी दविंदर सिंहशी संबंधित आरोपपत्र दाखल केले आहे. त्यानुसार मेहबुबा हिज्बुल मुजाहिदीनशी संबंधित दहशतवादी नावीद बाबू याला ओळखत होत्या व त्याच्याशी त्यांचे बोलणेही होत असे.
नावीद बाबूला अटक करण्यात आली असून एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात पहिल्यांदाच अशा प्रकारे मेहबुबा यांचे नाव आल्यामुळे खळबळ उडाली आहे. तपासाशी संबंधित सूत्रांच्या हवाल्याने आयएएनएस या वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे. मात्र यासंदर्भात अधिक तपशील देण्यास त्याने नकार दिला आहे.
दरम्यान, दहशतवाद्यांना त्यांच्या नापाक इराद्यांसाठी पैसे उभे करण्यास पीपल्स डेमोक्रॅटीक पार्टीचा अन्य नेता वहीद उम रहमान पर्रा आणि आणखी दोन जणांवरही एनआयएने आरोपपत्र दाखल केले आहे. जम्मू काश्मीरमध्ये राजकीय, विभाजनवादी आणि दहशतवादी अशी एक वेगळीच अभद्र युती कायम राहण्यात या नेत्याची प्रमुख भूमिका राहीली असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पर्राच्या व्यतिरिक्त शाहीन अहमद लोन आणि तफजुल हुसैन परिमू या दोघांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.