मेहबुबा मुफ्ती यांना पुन्हा अटक?, जाणून घ्या काय आहे प्रकरण

श्रीनगर – जम्मू-काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी पार्टीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांना पुन्हा एकदा अटक करण्यात आली असून त्यांची कन्या इल्तिजा हिला नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. स्वत: मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे.

मला पुन्हा एकदा बेकायदेशीरपणे अटक करण्यात आलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून जम्मू-काश्‍मीर प्रशासन मला पुलवामामध्ये जाऊन पक्षाचे नेते वहीद उर रहमान यांच्या कुटुंबाला भेटू देत नाही. भाजपचे मंत्री आणि मित्रपक्षाचे नेते राज्यात कुठेही फिरत आहेत. फक्त माझ्याबाबतीतच सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो का?, असा सवाल मेहबुबा मुफ्ती यांनी केला आहे.

पीडीपीचे नेते वहीद उर रहमान यांना तथ्यहिन आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. मला त्यांच्या कुटुंबीयांना भेटायचे आहे. पण भेटू दिलं जात नाही. माझी मुलगी इल्तिजालाही नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

तिलाही रहमान यांच्या कुटुंबीयांना भेटायचं होतं, असं मुफ्ती यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तिसऱ्या ट्विटमध्ये मात्र त्यांनी आज दुपारी एक पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं म्हटलं होतं.

जम्मू-काश्‍मीरला पुन्हा स्वायत्ता मिळून देण्यासाठी मेहबुबा मुफ्ती यांच्यासह माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला आणि जम्मू-काश्‍मीरमधील अनेक पक्ष एकत्र आले आहेत. अब्दुल्ला यांनी तर काश्‍मीरप्रश्नात चीनची मदत घेणार असल्याचीही भाषा केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून या नेत्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.