काँग्रेसचे ‘ते’ १२ आमदार फोडण्यामागे प्रशांत किशोर! ‘असा’ झाला काँग्रेसचा घात…

नवी दिल्ली – मेघालयातील काँग्रेसच्या १७ पैकी १२ आमदारांनी बुधवारी सायंकाळी उशिरा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला दिलेला हा मोठा धक्का मानला जातोय. तृणमूलमध्ये प्रवेश केलेल्या १२ आमदारांच्या गटाचे नेतृत्व करणाऱ्या मुकुल संगमा यांनी काँग्रेस सोडण्याच्या प्रक्रियेची सुरुवात प्रशांत किशोर यांच्यासोबत कोलकात्यात झालेल्या भेटीनंतर झाली होती असा धक्कादायक खुलासा केलाय. संगमा यांच्या खुलास्यामुळे मेघालय काँग्रेसला सुरुंग लावणारे प्रशांत किशोरचं असल्याचं स्पष्ट झालंय.

काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने व्हिन्सेंट पाला यांची मेघालय प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केल्यानंतर या घडामोडी घडल्याचं देखील संगमा यांनी सांगितलं.

“लोकशाहीमध्ये समतोल असायला हवा. त्यासाठी खंबीर विरोधी पक्षाची गरज आहे. आम्ही ही बाब दिल्लीतील नेतृत्वापर्यंत पोहचवली, अनेकदा दिल्लीच्या वाऱ्या केल्या मात्र काहीही घडलं नाही. प्रबळ विरोधी पक्षासाठी पर्याय शोधाताना मी माझे मित्र प्रशांत किशोर यांना कोलकात्यात भेटलो. यावेळी झालेल्या चर्चेत जनहित इतर कशाही पेक्षा श्रेष्ठ असल्यावर आमचं एकमत झालं.” असं सांगत संगमा यांनी तृणमूल प्रवेशामागील किशोर यांची महत्वपूर्ण भूमिका असल्याचं स्पष्ट केलं.

प्रशांत किशोर यांनी एप्रिल-मे महिन्यात झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जी यांचे निवडणूक सल्लागार म्हणून काम केलेआहे. राज्यात भाजपने सत्ताधारी तृणमूलला सुरुंग लावत पक्षातील मोठे नेते आपल्या गटात सामील करून घेतले होते. पक्षाला गळती लागलेली असताना देखील ममता यांनी एकहाती लढा देत बहुमत प्राप्त केले. बॅनर्जी यांच्या विजयात निवडणूक रणनीतीकर प्रशांत किशोर यांचे योगदान देखील महत्वपूर्ण आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपचं आव्हान मोडीत काढल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी आता आपला मोर्चा राष्ट्रीय राजकारणाकडे वळवला आहे. २०२३ त्रिपुरा विधानसभा निवडणुकांसाठी तृणमूलने जोरदार तयारी तयारी सुरु केली आहे. अशातच आता मेघालयात काँग्रेसला दिलेल्या धक्क्यामुळे बॅनर्जीं ईशान्येकडील सर्वच राज्य काबीज करण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय.

गेल्या काही दिवसांमध्ये तृणमूलने आसाम, गोवा, उत्तर प्रदेश, बिहार आणि हरियाणा या राज्यांमध्ये देखील पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. मात्र तृणमूलची आगेकूच ही काँग्रेसला सुरुंग लावूनच होत असल्याचं पाहायला मिळतंय.

गोवा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लुइझिन्हो फालेरो, हरियाणात राहुल गांधींचे माजी सहकारी अशोक तंवर आणि बिहारमध्ये जनता दल युनायटेडचे माजी नेते पवन वर्मा ही तृणमूलमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांची नावे आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.