मुश्‍ताक अली स्पर्धेत बिश्‍तचा विक्रम

नवी दिल्ली – सय्यद मुश्‍ताक अली टी-20 स्पर्धेत मिझोरामविरुद्धच्या सामन्यात मेघालयचा कर्णधार पुनीत बिश्‍त याने केवळ 51 चेंडूत 6 चौकार आणि 17 षटकारांसह नाबाद 146 धावांची वादळी खेळी केली. पुनीतची ही खेळी टी-20 मधील विक्रमी खेळी ठरली.

टी-20 क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज ठरला आहे. त्याने श्रीलंकेच्या दशुन शनाका याचा विक्रम मोडला. शनाकाने 2016 साली सिंहली स्पोर्टस क्‍लबकडून खेळताना नाबाद 131 धावा केल्या होत्या. तर भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत नाबाद 128 धावा केल्या होत्या. पंतने 2018 साली आयपीएलमध्ये हैदराबादविरुद्ध ही खेळी केली होती.

पुनीतने केलेल्या नाबाद 146 धावांमुळे टी-20 क्रिकेटमध्ये यष्टीरक्षकाकडून झालेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. याबाबत पुनीतने लोकेश राहुलला मागे टाकले. राहुलने 2020 सालच्या आयपीएलमध्ये पंजाबकडून खेळताना नाबाद 131 धावा केल्या होत्या. त्याबरोबर पुनीतने 17 षटकार मारून ख्रिस गेलच्या विक्रमाशी बरोबरी केली. एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या बाबतीत तो गेलसह संयुक्‍तपणे पहिल्या स्थानावर आहे.

गेलने 2013 साली पुणे वॉरियर्सकडून सर्वाधिक 17 षटकार मारले होते. पुनीतने भारताकडून एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला. हा विक्रम आधी श्रेयस अय्यरच्या नावावर होता. त्याने 2019 साली सिक्‍कीम विरुद्ध 145 धावा करताना 15 षटकार मारले होते. मिझोराम विरुद्धच्या या सामन्यात पुनीतच्या वादळी खेळीने मेघालयने 20 षटकात 6 बाद 230 धावा केल्या. उत्तरादाखल मिझोरामला 100 धावा करता आल्या आणि मेघालयने हा सामना 130 धावांनी जिंकला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.