उमेदवार साधणार रविवारचा मुहूर्त
पुणे – उमेदवारी अर्ज भरल्यानंतर येणाऱ्या प्रचाराच्या पहिल्याच रविवाराची संधी साधण्यासाठी विधानसभेचे इच्छूक तयारीला लागले आहेत. रविवारी अनेक उमेदवार प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात होणार आहे. दरम्यान, शनिवारी उमेदवारी अर्जांची छाननी असल्याने दुपारनंतर उमेदवारांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेत रविवारचे नियोजन केल्याचे दिसून आले.
विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शुक्रवारी मुदत संपली. त्यानंतर शनिवारी सर्वच विधानसभा मतदासंघाच्या उमेदवारी अर्जांची छाननी झाली. यात सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी हजेरी लावली होती. दुपारनंतर छाननी पूर्ण होताच, सर्वच उमेदवारांनी प्रचाराच्या रणनितीचे नियोजन आखले असून प्रचाराच्या शुभारंभासाठी रविवारचा मुहूर्त साधला आहे.
यानंतर उमेदवारांना आणखी एक रविवार (दि.13) रोजी मतदारांच्या भेटीगाठीसाठी मिळणार आहे. तर त्यानंतरच्या रविवारी (दि.20) रोजी जाहीर प्रचाराची मुदत संपणार आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रचार करता येणार नाही. ही बाब लक्षात घेऊन पहिल्याच रविवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यासाठी सर्वच उमेदवार सरासवले आहेत. नोकरदार वर्ग रविवारी साधारपणे घरीच असल्याने ही संधी साधण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रचारफेऱ्या तसेच कार्यकर्ता बैठका आणि मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.