महापारेषणमध्ये ‘मेगाभरती’! लवकरच 8500 पदं भरणार – ऊर्जामंत्री नितीन राऊत

मुंबई  – ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत सुमारे 8500 तांत्रिक श्रेणीतील रिक्त पदांची महा-भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. या निर्णयामुळे राज्यातील तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यात वीज पारेषण कंपनीत तांत्रिक श्रेणीतील 8 हजार 500 पदांची ही भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे. तांत्रिक संवर्गातील 6750 पदे व अभियंता संवर्गातील 1762 पदांची मेगा भरती करण्यासाठी महापारेषण व्यवस्थापन तयारी करीत आहेत.

ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांच्या सूचनेनुसार महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी पदभरती प्रस्ताव तयार करून सादर केला. या विषयावर झालेल्या बैठकीत डॉ. राऊत यांनी ही पदभरती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. नव्याने होणाऱ्या या पदभरतीत आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय अभियांत्रिकी पदवीधारकांनाही नोकरीची संधी या भरतीत निर्माण होणार आहे.

यासोबतच बक्षी समितीच्या शिफारशीनुसार पदांचा तुलनात्मक विचार करण्यात येऊन भरती प्रक्रिया राबविण्यात यावी व राज्य शासनास नवा मंजूर पदाचा आकृतीबंध सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

पूर्वीच्या महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे सन 2005 मध्ये महावितरण, महापारेषण, महानिर्मिती व सूत्रधारी कंपन्यांमध्ये विभाजन झाल्यानंतर महापारेषण कंपनीत रिक्त पदांची संख्या वाढत गेल्यानंतरही अपेक्षित भरती झाली नाही. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा वाढल्याने ताण निर्माण झाला आहे. आता लवकरच पदभरती होत असल्याने नोकरीची संधी तरुणांना उपलब्ध होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.