386 कर्मचाऱ्यांना देणार प्रशिक्षण : 2695 लिटर लस साठविण्याची क्षमता
32 शीतसाखळी केंद्र तयार : जानेवारी महिन्यात लस येण्याची शक्यता
पिंपरी – करोनावरील लस जानेवारी महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरणासाठी मेगाप्लॅन तयार करण्यात आला आहे. यासाठी महापालिकेच्या 386 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर तब्बल 2 हजार 695 लिटर लस साठविण्याची क्षमता असलेले 32 शीतसाखळी केंद्र तयार करण्यात आले आहे.
करोना महामारीच्या नियंत्रणासाठी कोविड -19 लस निर्मितीचे काम सुरू आहे. यासाठी भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी आगामी कोविड 19 लसीकरण नियोजनासाठी भारत देशातील सर्व शासकिय व खाजगी आरोग्य सेवा कर्मचारी यांची माहिती संकलन करण्याचे काम सुरु केले आहे. येत्या जानेवारी महिन्यामध्ये प्रत्यक्ष लसीकरणासाठी सुरूवात होण्याची शक्यता आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील शासकीय, मनपा व खासगी आस्थापना आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रातील नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांना कोविड-19 प्रतिबंधक लस देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडे आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी 73, पी.एच.एन. 8, स्टाफनर्स 21, ए.एन.एम.136 व आशा स्वयंसेविका 148 असे 386 एवढे मनुष्यबळ उपलब्ध आहे. कोवीड-19 लसी साठी 32 शितसाखळी केंद्रे आहेत व 2 हजार 695 लीटर क्षमतेची जागा उपलब्ध आहे.
लसीकरणासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सोमवार व मंगळवार हे दोन दिवस प्रशिक्षण देण्यात आले. तसेच वैद्यकिय अधिकारी व पी.एच.एन. यांचे प्रशिक्षण बुधवार (दि.16) व गुरूवारी (दि. 17) आयोजित केलेले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इतर आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांचे प्रशिक्षण वैद्यकीय अधिकारी व पी.एच.एन. यांच्यामार्फत दवाखाना व रुग्णालय स्तरावर आयोजित करण्यात येत आहे.
सारथी ऍपवर नोंदणी करण्याचे आवाहन
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड-19 प्रतिबंधक लस पहिल्या टप्प्यात पिंपरी चिंचवड शहरातील शासकिय, मनपा व खासगी आस्थापना आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रातील नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या वैद्यकिय विभागामार्फत सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांना कोविड-19 प्रतिबंधक लस घेण्याबाबतची नोंदणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सारथी ऍप वर करण्याचे आवाहन केले आहे.