शहरात सामसूम ग्रामीण भागात बैठका, दौऱ्यांचा सपाटा

नगर – लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला 14 दिवसांचा कालावधी शिल्लक असताना कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी व भाजप – शिवसेना युतीने ग्रामीण भागात दौरे, बैठकांचा सपाटा लावल्याचे चित्र आहे. महापालिका क्षेत्रात अद्यापही राजकीय पटलावर सामसूम दिसत असून, आयपीएल क्रिकेट सामन्यांमुळे प्रचार प्रभावित झाल्याचे बोलल्या जात आहे. पक्षाचा आत्मा अशी ओळख असणारे तरुण कार्यकर्ते क्रिकेट सामन्यांत दंग असल्याने राजकीय पक्षांच्या डोकेदुखीत वाढ झाल्याची चर्चा आहे.

नगर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात युती व आघाडीने एकमेकांविरोधात दंड थोपटले आहेत. या दोन पक्षांसह अन्य पक्षांच्या उमेदवारांनी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या भेटीगाठी घेणे, कॉर्नर बैठकांच्या माध्यमातून मतदानासाठी जनजागृती करणे व पक्षाची ध्येयधोरणे समजावून सांगण्यासाठी मागील सहा महिन्यांपासूनच भाजप व राष्ट्रवादीने पुढाकार घेतल्याचे चित्र होते. नगर दक्षिण ग्रामीण भागाला पिंजून काढण्यात या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर व उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतरही संबंधित राजकीय पक्षांनी ग्रामीण भागालाच प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. कॉर्नर बैठका, मेळाव्यांचा धडाक्‍यात सुरू आहे. त्या तुलनेत शहरात मात्र सामसूम असून, प्रचार, बैठका किंवा सभांचा कोठेही मागमूस नसल्याचे चित्र समोर आले आहे.

उन्हामुळे मतदारही भेटेनात

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यांत उन्हाचा पारा 43 अंशाच्या पार गेला आहे. सूर्यनारायण आग ओकू लागल्यामुळे निवडणूक रिंगणातील उमेदवारांना मतदारही भेटत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सकाळी 11 पर्यंत व सायंकाळी 6 नंतर मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचे नियोजन राजकीय पक्षांकडून केल्या जात असल्याची माहिती आहे.

क्रिकेट सामन्यांमुळे डोकेदुखी

ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आयपीएल क्रिकेट सामने रंगात आले आहेत. बोटावर मोजता येणारे कार्यकर्ते वगळल्यास बहुतांश कार्यकर्ते क्रिकेटचे सामने पाहण्यात दंग असल्याचे चित्र आहे. यामुळे शहरी भागात बैठका घेणे, प्रचार करणे तूर्तास तरी अवघड झाले असून, यामुळे राजकीय पक्षांची डोके दुखी वाढल्याचे बोलल्या जात आहे.

खर्च बचतीचा उपाय सापडला !

उन्हाची वाढलेली तीव्रता त्यातच क्रिकेट सामन्यांची पडलेली भर लक्षात घेता शहरात मतदारांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्येही निवडणुकीबद्दल फारसा उत्साह नसल्याचे चित्र आहे. नेमक्‍या याच परिस्थितीचा फायदा घेत काही राजकीय पक्षांना खर्चाच्या बचतीचा उपाय सापडल्याची खमंग चर्चा शहरात रंगली आहे. तर पक्षाकडूनही खर्च होत नसल्याने काम कसे करायचे, असा सवाल कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.