प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मावळमध्ये सभांचा धडाका

पिंपरी – मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रचारासाठी चारच दिवस शिल्लक राहिले असल्याने उमेदवारांनी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर वाढविला आहे. तसेच मावळ लोकसभा मतदार संघात राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. शेवटच्या टप्प्यात मतदार संघात प्रचार सभांचा धडाका होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या सभा होणार आहेत. तर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शहरातील प्रमुख व्यापारी, खेळाडू आदींच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे.

मावळ लोकसभेसाठी सोमवारी (दि. 29) मतदान होणार आहे. प्रचारासाठी 27 तारखेला सायंकाळी पाच वाजेपर्यंतची वेळ उमेदवारांना मिळणार आहे. मतदारांच्या गाठीभेटी, पदयात्रा, प्रचार सभा, कोपरा सभा, बैठका, रॅली आदींच्या माध्यमातून प्रचाराचा धडाका सुरू आहे. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काळेवाडी फाटा येथे गुरुवारी सायंकाळी 6 वाजता सभा होणार आहे. त्यासाठी खासदार रामदास आठवले, शिवसेना नेते संजय राऊत आदी उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची शुक्रवारी (दि. 26) मोहपाडा (ता. उरण) येथे सायंकाळी सहा वाजता सभा होणार आहे.

कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी काळेवाडी येथे सकाळी 10 वाजता तर, दापोडी येथील त्रैलोक्‍य हॉलमध्ये दुपारी 2 वाजता विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची सभा होणार आहे. तर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी (दि. 25) शहरात ठाण मांडून बसले आहेत. त्यांनी व्यापारी, खेळाडू व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे. तसेच इंटक कामगार संघटनेतर्फे पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मैदानाजवळ आयोजित कामगार मेळाव्याला हजेरी लावणार आहेत.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील यांच्या प्रचारासाठी शनिवारी (दि.27) सायंकाळी सात वाजता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील यांची उरण विभागात सभा होणार आहे.

मावळ मतदारसंघात खासदार बारणे यांच्यासमोर गड राखण्याचे आव्हान कायम आहे. त्यामुळे त्यांनी नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबविण्यावर भर दिला आहे. पार्थ पवार यांना निवडून आणण्यासाठी पवार कुटूंबियांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे त्यांनी अक्षरश: मतदारसंघ पिंजून काढण्यावर भर दिला आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील यांनी देखील शेवटच्या टप्प्यात जनसंपर्कावर विशेष भर दिला आहे.

“मावळ लोकसभेसाठी उमेदवारांना शनिवारी (दि. 27) सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे. त्यानंतर त्यांना प्रचार करता येणार नाही. उमेदवारांनी प्रचारादरम्यान जादा वाहने वापरल्याचे निदर्शनास आल्यास त्यासाठी केलेला खर्च उमेदवारांच्या खर्चात समाविष्ट केला जाईल. त्याशिवाय, उमेदवारांनी राजकीय पदाधिकाऱ्यांच्या सभांसाठी परवानगी घेतली आहे का, त्याची पडताळणी केली जाते.’
– कविता द्विवेदी, निवडणूक निर्णय अधिकारी, मावळ

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.