भेट तुझी माझी स्मरते…

“भेटूया?’ असं तू मला विचारलंस आणि भेटीचा दिवस ठरल्यापासून मी भांबावलेच होते. कोणता ड्रेस घालायचा? जीन्स टॉप की पंजाबी? साडी वगैरे शक्‍य नाहीच; पण तुला माझा मॉडर्न लुक आवडेल ना? की साधा? तसं काही तू जुन्या विचारांचा नव्हतास, पण तुला मी पाहताक्षणी आवडले पाहिजे ह्यासाठी हा सगळा विचारांचा खटाटोप चाललेला… कारण ही आपली पहिली भेट ना मला अविस्मरणीय करायची होती. एकदा तू “मला लाल रंग आवडतो, तुला खुलून दिसेल…’ असं काहीसं म्हटलेलं आठवलं, आणि सगळे लाल रंगाचे ड्रेस मी मांडून बसले.

एक एक ड्रेस ट्राय करत एक अनारकली सिलेक्‍ट केला. खूप सुंदर दिसत होते मी त्यात. जरीची बॉर्डर, बंगलोर सिल्कचा हिरव्या रंगाचा दुपट्टा, नक्की तू फिदा होणार माझ्यावर, असे मनातच विचार आले आणि लाजले. कानात एक छोटंसं काहीतरी आणि गळा मोकळाच ठेवायचा असं ठरवलं. कारण माझे सोडलेले कुरळे केसच माझ्या सौंदर्यात 100% भर घालतात हे मला पक्कं ठाऊक होतं आणि तुलाही.

“तुला कोणता रंग आवडतो?’ सकाळीच तुझा मेसेज. “तसं तुला काहीही छान दिसतं, पण तो ब्लॅक वाला टी शर्ट घालशील? त्यात तू प्रचंड हॅण्डसम दिसतोस.’ “थॅंक्‍स… तोच घालतो. चल भेटू संध्याकाळी.’ संध्याकाळीच तर भेटणार होतो. पण सकाळपासून पन्नास वेळा तुझा डीपी झूम करून बघत होते. तू माझी आवड होतास, आणि मला अभिमान होता माझ्या आवडीचा.

पाच वाजता रिक्षा पकडली. रिक्षेच्या आरशात सतत माझे प्रतिबिंब बघत होते. लिपस्टिक ओके आहे ना? लायनर बाहेर नाही ना आलंय? आणि हे केस का उडत आहेत? नेमके भेटीच्यावेळी पूर्ण वाईट दिसतील म्हणून पिनेने वर गच्च बांधून ठेवले. तरीही केसांच्या चार पाच बटा सतत डोळ्यांवर येऊन त्रास देत होत्याच. प्रचंड ट्रॅफिक लागला. उन्हाने हैराण झाले होते. आणि माझा चेहरा आता घामट होणार, मग मी वाईट दिसणार ह्याचंच टेन्शन यायला लागलं.

व्हॉट्‌सअप चेक केलं. तुझा काही मेसेज नाही ना? पण नव्हता काही आणि तेवढ्यात, “मॅडम आ गया आपका स्टॉप,’ असं रिक्षावाला ओरडला. नेमके पर्समध्ये सुट्टे पैसेच मिळेनात. अगदी गोंधळ उडाला. उशीर तर नाही ना झाला? तू आला असशील ना माझ्या आधी? वाट बघून गेला नसशील ना? असे अनेक प्रश्‍न मनात आले. कारण ट्रॅफिकमुळे वीस एक मिनिटे उशीर झाला होता. पैसे अक्षरश: कोंबले रिक्षावाल्याच्या हातात आणि उतरून तुला इकडे तिकडे पाहू लागले.

तू होतास कोपऱ्यावर उभा… डोळ्यांवर गॉगल, काळा टी शर्ट… बाईकवर बसलेला. असं वाटलं, जाऊन तुला एक घट्ट मिठी मारावी… पण हे मनातच… प्रत्यक्ष करण्याचे धाडस नव्हतेच. रस्ता ओलांडून तुझ्याजवळ आले. पहिलीच भेट. दोघे एकमेकांकडे बघण्यात दोन मिनिटे गेली… लक्षात आले… बावरून इकडे तिकडे बघितलं.

“चल बस गाडीवर, चहा पिऊया कुठेतरी, खाऊ काहीतरी, भूक लागली आहे… आणि खूप सुंदर दिसते आहेस…’ “तू ही…’ मला खरं तर खूप काही बोलायचं होतं. पण इतकंच बोलले. हॉटेलमध्ये माझ्यासमोर बसून बघत मात्र नव्हतास माझ्याकडे, आणि मला मात्र काय काय वाटत होतं की, हात घ्यावास हातात, माझी स्तुती करावीस, ड्रेस छान आहे! आणि अचानक लक्षात आलं, गडबडीत केस मोकळे सोडायचे राहिलेच, हात मागे करून पिन सोडणार तेवढ्यात तू हात पकडलास…

“नको ना… ह्या बटा लपतील सोडलेल्या केसांत, ज्या तुझ्या सौंदर्याला चार चांद लावत आहेत… आणि मग हे नितळ सौंदर्य सुद्धा लपेल त्या केसांत… राहू देत असेच बांधलेले केस…’ मोरपीस फिरवल्यागत झालं अक्षरशः हे ऐकून, आणि ईश्‍श्‍श असं हलकेच आलं तोंडून … ज्याचं मलाच कोण आश्‍चर्य वाटलं “हे हवंय आणि मला जन्मभर…’ तू म्हणालास आणि मी चेहरा हळूच लपवला दोन हातांच्या ओंजळीत…

– मानसी चापेकर

Leave A Reply

Your email address will not be published.