कॉंग्रेसमधील गट-तटामुळे सभा तहकूब

पुणे -जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या रिक्‍त झालेल्या एका जागेवर कॉंग्रेसच्या सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांची नियुक्‍ती अपेक्षित होती. मात्र, त्यांचा पत्ता कट करण्यासाठी कॉंग्रेस पक्षातच दोन गट असल्याचा धक्‍कादायक प्रकार दिसून आला. आजच्या सर्वसाधारण सभेत होणाऱ्या नियुक्‍तीसाठी प्रदेश कॉंग्रेसकडून अंकिता पाटील यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. मात्र, कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी दुसऱ्याच सदस्याचे नाव पुढे केल्यामुळे गोंधळ उडाला. त्यामुळे सभागृहात तणाव वाढल्यामुळे अखेर प्रशासनाला सर्वसाधारण सभा तहकूब करावी लागली.

सभागृहातील गोंधळ आणि दोन्ही कॉंग्रेस नेत्यांकडून येत असलेल्या दबावामुळे अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते यांच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे ते तातडीने रुग्णालयात गेले. तपासणी करून सभागृहात आले. तोपर्यंत विरोधकांनी कामकाज सुरू करून सभा तहकूब केली होती. दरम्यान, रत्नप्रभा पाटील यांच्या निधनामुळे रिक्‍त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीत त्यांची नात आणि कॉंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील या निवडून आल्या. त्यामुळे त्यांची स्थायी समितीच्या जागी निवड करण्याची प्रक्रिया सर्वसाधारण सभेत होणार होती. पाटील यांचीच निवड होणार असल्याचे सर्वश्रूत होते.

परंतु, कॉंग्रेसचे पुरंदरमधील सदस्य दत्ता झुरगे यांनी बुधवारी कृषी समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला. सभापती सुजाता पवार यांनी तो तत्काळ मंजूरही केला. हे सगळे काही तासात घडले आणि गुरुवारी (दि.23) लागलीच स्थायी समिती सदस्य पदासाठी झुरुंगे यांनी अर्ज भरला. त्याबाबत जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी झुरुंगे यांच्या नावाचे पत्र अध्यक्ष देवकाते यांच्याकडे दिले. तर गुरुवारी सकाळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसने जगताप यांना अंकिता पाटील यांची निवड करावी यासाठी पत्र दिले. मात्र, या दोघांनीही उमेदवारी अर्ज भरल्याने निवड कोणाची करावी हा प्रश्‍न सभागृहापुढे पडला. या सगळ्या प्रकरणांमध्ये मोठी राजकीय खलबते झाली. त्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची खेळी असल्याची चर्चा सभागृहात सुरू झाली.

“मी माघारही घेतली असती; मला सभागृहात बोलू तरी द्यायचे’
जिल्हा परिषदेतील माझा पहिला दिवस, पहिल्याच सर्वसाधारण सभेत होणाऱ्या स्थायी समिती सदस्य नियुक्‍तीसाठी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी थेट माझे नाव सूचविले होते. असे असतानाही जिल्हा परिषदेत जो गोंधळ झाला त्यामुळे खूप मनस्ताप झाला. मला जिल्ह्यातील युवकांचे प्रश्‍न मांडायचे आहे, कामकाज कसे चालते हे समजून घ्यायचे होते. मला सभागृहाचे काम थांबवायचे नव्हते. मी माघार घ्यायलाही तयार होते. परंतु, माझे म्हणणेही कुणी ऐकून घेतले नाही, या राजकीय खेळीमुळे मी नाराज झाल्याची भावना सदस्या अंकिता पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्‍त केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.