मिटिंग यूपीएससी गर्ल अरेंज्ड मॅरेज…


यूपीएससीची परीक्षा पास होऊन अधिकारी झाल्याशिवाय लग्न करायचे नाही, असे ठरवलेल्या अनू नावाच्या मुलीची ही कथा आहे. कथा म्हणण्यापेक्षा तिच्या बाबतीत घडलेला एक प्रसंग. म्हटले तर हा प्रसंग मिश्‍कील, साधासुधा आहे आणि म्हटले तर मानवी स्वभावातील अनेक रंग दाखवणारा आहे.

अंगाने बोजड असलेला मनोहर नावाचा तरुण, कॅफेमधे एका स्मार्ट मुलीसमोर बसला आहे. त्याचा मोबाइलमधला फोटो पाहात अनू म्हणते, “फोटोमधे तर तुम्ही वेगळे दिसता…’ तो सरळपणे म्हणतो, “हो, तो जरा आधीचा आहे. आई म्हणाली, तुझा आत्ताचा फोटो पाठवला तर मुलगी भेटायला येणे कठीण. मी आता जाड दिसतो ना…’ अनू म्हणते, “मला लग्नच करायचं नाही… कुणाशीच.’ तो विचारतो, “कधीच?’ मग ती सांगते की, तिला घरातल्या काकांमुळे उगाचच मुलांना भेटावे लागते.

चिडून म्हणते, “त्यांच्या स्वतःच्या तीनतीन मुली आहेत लग्नाच्या; मीही एक साधी नोकरी करतेच आहे; तरी सारखे माझ्यासाठी स्थळे आणत असतात. दर रविवार माझा असा फुकट जातो.’ मग तिथून उठून जाताना म्हणते, “सॉरी, मी तुमच्यावर उगाच चिडले. …पण लग्न करायचं नाहीय मला.’ मनोहर तिला स्वतःच्या नोकरीविषयी सांगू पाहतो… पण तिला अजिबात इंटरेस्ट नसतो. तेवढ्यात तो तिला सौम्यपणे म्हणतो, “अनूजी, लग्न न करण्याचं कारण नाही सांगितलंत तुम्ही मला.’

ती लक्ष न देता चालू लागते. हा तिला ऐकू जाईलशा मोठ्या आवाजात म्हणतो, “ठीकंय, मग मी घरी सांगतो की, तुम्हाला दुसरा कुणी मुलगा पसंत आहे.’ यावर मात्र ती गर्रकन वळते. त्याच्यासमोर येऊन म्हणते, “मला ना, मुलगा, लग्न, संसार या भानगडीत सध्या पडायचेच नाहीय. मी आधी यूपीएससी परीक्षा पास होणार, मोठी अधिकारी होणार मग बघू लग्नबिग्न!’ मनोहर गालातल्या गालात हसतो आणि पुटपुटतो, “हं… झालंच म्हणजे तुमचं लग्न!’ हे ऐकताच अनू भडकते. रागारागाने त्याच्यासमोर येऊन बसते आणि जोरात म्हणते, “म्हणजे? काय म्हणायचंय तुम्हाला? मी यूपीएससी परीक्षा पास होऊ शकणार नाही? तुम्ही पुरुष किती संकुचित मनाचे असता! महिला जिद्दीनं पुढं जातायत, मोठ्या पदावर नोकरी करणार, हे पुरुषप्रधान संस्कृतीतल्या पुरुषांना कसं रुचणार? मी जरी केलं ना लग्न कधी, तरी तुमच्यासारख्यांशी तर कधीच करणार नाही!’ ती बोलायची थोडी थांबल्यावर तो शांतपणे तिला म्हणतो, “झालं का सगळं बोलून? …मी निघू?’

तो उठतो. चार पावलं जातो आणि वळून परत येतो. तिच्यासमोर बसून म्हणतो, “आता मला बोलायचंय. तुमच्यात ऑफिसर बनण्याचे गुण आहेत असं दिसतं. तुम्ही हुशार आहात, धीट आहात आणि मनात असेल ते तुम्ही धाडकन बोलता… पण मग तुम्ही का भीता?’ ती गोंधळून म्हणते, “मी?’ तो म्हणतो, “तर काय… जाऊन सांगा तुमच्या काकांना की, तुम्ही यूपीएससी परीक्षा पास केल्याशिवाय लग्न करणार नाही. कशाला असा रविवार वाया घालवता? तो वेळ तुम्ही अभ्यासासाठी कारणी लावा.’ हिच्या लक्षात येतं, आपण समजलो तसा हा नाहीयं. याचा स्वभाव वेगळा आहे. मनोहर म्हणतो, “कोण जाणे, चांगला अभ्यास केलात तर तुम्ही टॉपला जाल.

आमच्याच ऑफिसमधे ऑफिसर म्हणून याल आणि एक नक्‍की सांगतो की, तुम्ही जर माझ्या बॉस म्हणून आलात तर माझ्याइतका आनंद कुणालाच होणार नाही.’ तो कळकळीने बोलत असतो. अनूसुद्धा त्याचे बोलणे आता गांभीर्याने ऐकू लागते. तो म्हणतो, “मी पुरुषप्रधान संस्कृतीचा अजिबात पुरस्कर्ता नाहीयं. तसं मला कधी व्हायचंही नाही. मला माहितेय, स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने… किंबहुना जास्तच हुशार असते.’ असे म्हणून तो उठतो आणि निघतो. तिला कळते की, आपण असे वागायला नको होते. ती त्याला आग्रहानं थांबवून घेते.

खाणे मागवते. दोघांमधे मित्रत्वाने गप्पा सुरू होतात. तो स्वभावानं इतका साधा की तो म्हणतो, “तुम्हाला अगदीच लग्न करावं लागलं ना, तर माझ्याशी करा. तुम्ही आताची नोकरी सोडून द्या. बाकीच्या सगळ्या कटकटी मिटतील. आरामात अभ्यास करा. तुमचे घरचेपण खूश!’ अनू त्याला म्हणते, “लग्नाशिवाय खूप गोष्टी आहेत मनोहर जगात. स्वतःचा शोध घ्या. काय आवडतं ते पाहा. छंद वाढवा. आयुष्य एन्जॉय करा.’ दोघेही निघतात. तो तिला तिच्या घरी सोडतो. नंतर स्वतःच्या घरी येऊन आईला फोन लावून सांगतो, “आई, लग्न म्हणजेच काही आयुष्याचं सार्थक नाही.

मी माझ्या आवडीच्या गोष्टींमधे प्रावीण्य मिळवेन. छंद वाढवेन.’ थोडक्‍यात, दोघांनीही एकमेकांचे विचार आपलेसे केलेले असतात. परस्परांना समजून घेतलेलं असतं. त्यांचं एकमेकांशी लग्न होईल, न होईल. दोघे एकमेकांचे मित्र तर चांगले झालेले असतात. यातल्या मनोहर आणि अनूच्या भूमिका फार बेमालूम वठल्या आहेत. आवाज, देहबोली, संवादातले सगळे भाव यातून त्यांचे व्यक्‍तिमत्त्व उत्तमरित्या व्यक्‍त होते. अशा वेळी वाटतं, आपल्याकडे चांगल्या अभिनेत्यांची कमतरता नाही. फक्‍त त्यांना तसा वाव मिळायला हवा.

माधुरी तळवलकर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.