घरवापसीसाठी उत्सुक नेत्यांनी घेतली शरद पवार यांची भेट – नवाब मलिक

मुंबई -विधानसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केलेले काही नेते घरवापसीसाठी उत्सुक असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. अशातच स्वगृही परतण्याची चाचपणी करण्यासाठी काही नेत्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचा दावा त्या पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

सुमारे डझनभर आमदार भाजपमधून फुटण्याच्या तयारीत असल्याच्या एका वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्या वृत्ताला एकप्रकारे दुजोरा देणारे वक्तव्य मलिक यांनी केले आहे. राष्ट्रवादीत परतण्याच्या शक्‍यतेवर चर्चा करण्यासाठी काही नेत्यांनी पवार यांची भेट घेतली. मात्र, त्याबाबत राष्ट्रवादीचा निर्णय अजून व्हायचायं, असे मलिक येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

मात्र, पवार यांची भेट घेणाऱ्या नेत्यांची नावे जाहीर करण्याचे त्यांनी टाळले. भाजपमधील संभाव्य फुटीचा दावा करणाऱ्या वृत्ताचा संदर्भ देऊन त्यांनी त्या पक्षावर निशाणा साधला. त्या वृत्तामुळे देशभरात मोदी लाट ओसरत असल्याचे सूचित होते. तसेच, महाराष्ट्रातही भाजपची ताकद कमी होत असल्याचे दिसते, असे मलिक यांनी म्हटले.

निवडणुकीआधी राज्यातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्या घडामोडीकडे भाजपमधील मेगाभरती म्हणून पाहिले गेले. मात्र, मोठ्या राजकीय उलथापालथींनंतर राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे वृत्त आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.